ऑनलाईन टीम / लखनऊ :
धार्मिक स्थळांवर आक्षेपार्ह पोस्टर्स, फाटलेली धार्मिक पुस्तके आणि डुकराचे मांस फेकून दंगल घडविण्याचा कट (conspiracy to riot in ayodhya) रचल्याप्रकरणी उत्तरप्रदेश पोलिसांनी सात जणांना अटक (seven arrested) केली आहे. तर चार जण बेपत्ता असून, पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.
हिंदू योद्धा संघटनेचा प्रमुख महेश मिश्रा (chief of hindu yodhha mahesh mishra) याने दिल्लीच्या जहांगीरपुरी दंगलीचा सूड उगवण्यासाठी अयोध्येत दंगल घडविण्याचा कट रचला होता. या कटात एकूण अकरा जण सहभागी होते. आरोपींनी अयोध्येतील मशिद काश्मिरी मोहल्ला, टाटशाह मशिद, घोसियाना रामनगर मशिद, ईदगाह सिव्हिल लाइन मशिद व दर्गाह जेलच्या मागे मांस व आक्षेपार्ह पोस्टर टाकले होते. काही ठिकाणी धार्मिक पुस्तके फेकून जातीय तणाव निर्माण करण्याचा प्रयत्नही केला होता.
मशिदींबाहेर मांस टाकताना पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी आरोपींनी गोल जाळीदार टोप्या घातल्या होत्या. हा प्रकार सीसीटिव्हीत कैद व्हावा, अशीही आरोपींची इच्छा होती. त्यामुळे त्यांनी सीसीटिव्ही असलेल्या मशिदींची निवड केली होती. पोलिसांनी तात्काळ तपासाची सूत्रे हालवत महेश कुमार मिश्रा, प्रत्युष श्रीवास्तव, नितिन कुमार, दीपक कुमार गौर उर्फ गुंजन, बृजेश पांडे, शत्रुघ्न प्रजापती, विमल पांडे या सात आरोपींना अटक केली. शहरातील वातावरण बिघडविण्याच्या हेतूने त्यांनी हे कृत्य केल्याचे आरोपींनी चौकशीत सांगितले असून, आणखी चार जण फरार असून, त्यांचा शोध सुरू आहे.