शस्त्रास्त्रांनी भरलेली सुटकेस जप्त : फिरोजपूरमध्ये बीएसएफची कारवाई
अमृतसर / वृत्तसंस्था
पंजाबमध्ये सीमा सुरक्षा दलाने (बीएसएफ) पाकिस्तानस्थित दहशतवाद्यांचा आणखी एक प्रयत्न हाणून पाडला आहे. बीएसएफने फिरोजपूर येथून शस्त्रांनी भरलेली सुटकेस जप्त केली. सदर बॅगमध्ये मोठय़ा प्रमाणात शस्त्रे आणि दारूगोळा सापडला आहे. बीएसएफने बॅग ताब्यात घेऊन तपास सुरू केला आहे. ही बॅग ड्रोनच्या माध्यमातून येथे पोहोचवण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. बीएसएफने बॅगमधून 3 एके-47 आणि 15 पिस्तूल-रायफल्ससह 30 बोअरच्या 100 आणि 5.56 एमएमच्या 100 गोळय़ा जप्त करण्यात आल्या आहेत.
फिरोजपूर सेक्टरमध्ये बीएसएफच्या 136 बटालियनच्या वतीने शोधमोहीम राबवण्यात आली. बीएसएफला गुप्तचर यंत्रणांकडून मिळालेल्या माहितीनंतर शोधमोहीम सुरू करण्यात आली असता ‘शून्य रेषे’जवळ एक मोठी सुटकेस दिसली. त्याची तपासणी केली असता त्यात मोठय़ा प्रमाणात दारूगोळा भरलेला होता. बीएसएफच्या जवानांनी तातडीने याची माहिती वरि÷ अधिकाऱयांना दिल्यानंतर तपास यंत्रणा अलर्टवर आल्या आहेत. पंजाबमध्ये शस्त्रांची एवढी मोठी खेप पाठवण्यामागे वातावरण बिघडवणे हाच मुख्य उद्देश असल्याचा संशय आहे. पाकिस्तानात बसलेल्या दहशतवाद्यांना पंजाबमधील ड्रग्ज तस्कर आणि गुंडांचा वापर करून पंजाबमध्ये दहशत पसरवण्याचा इरादा केल्याचे दिसून येत आहे. त्याचबरोबर यापूर्वी सातत्याने पाठवले जाणारे ड्रोन हे बीएसएफचे लक्ष वळवण्यासाठीच असू शकतात, असे तज्ञांचे मत आहे. पाकिस्तानात बसलेले तस्कर आणि दहशतवादी आपले लक्ष दुसरीकडे वळवून प्रचंड प्रमाणात शस्त्रास्त्रे आणि हेरॉईनची खेप पंजाबपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहेत.
‘नार्को टेरर’चा धोका
पाकिस्तानला आता जम्मू-काश्मीरमधून पंजाबकडे लक्ष वळवायचे आहे, असेही केंद्रीय यंत्रणांचे मत आहे. जम्मू-काश्मीरमध्ये कडक कारवाई केल्यानंतर पाकिस्तानी दहशतवाद्यांनी हा निर्णय घेतला आहे. पंजाबमध्ये दहशत पसरवण्यासाठी पाकिस्तान मोठय़ा प्रमाणात निधीही पुरवत आहे. एवढेच नाही तर आता तस्करीचा मार्ग अवलंबून दहशत पसरवली जात आहे. दहशतवाद्यांच्या अशा कारनाम्यांना ‘नार्को टेरर’ असे नाव देण्यात आले आहे.