कोल्हापूर : जुना राजवाडा पोलीस ठाण्यातील सहायक पोलीस निरीक्षक नागेश म्हात्रे आणि पोलीस कॉन्स्टेबल रुपेश कुंभार या दोघांना आठ लाख रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडलं. सांगली येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने मध्यरात्री अडीच वाजता जुना राजवाडा पोलीस ठाण्यातच ही कारवाई केली. या घटनेमुळे कोल्हापूर पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे.
अँटी करप्शन विभागाने या दोघांना ताब्यात घेतल्यानंतर सहायक पोलीस निरीक्षक नागेश म्हात्रे याची तब्येत बिघडल्याने त्याला उपचारासाठी सीपीआर येथे दाखल करण्यात आलं आहे. तर पोलीस कॉन्स्टेबल रुपेश कुंभार याला कोल्हापुरातील अँटी करप्शनच्या कार्यालयात नेण्यात आलं आहे. गेल्या वर्षाच्या सुरुवातीलाच स्थानिक गुन्हे शाखेतील दोघा जणांना दहा लाख रुपयाची लाच घेताना अँटी करप्शन विभागाने रंगेहाथ पकडल होतं. त्यानंतर पुन्हा जुना राजवाडा पोलीस ठाण्यातच आठ लाख रुपयाची लाच स्वीकारताना कारवाई झाल्याने खाकीला पुन्हा डाग लागला.