प्रतिनिधी /बेळगाव
सांबरा येथील बेळगाव विमानतळाला दोन फ्लाईंग टेनिंग ऑर्गनायझेशन (एफटीओ) मंजूर झाले होते. यापैकी बेंगळूर येथील समवर्धने प्रा. लि. ने हँगर उभारणीला सुरुवात केली आहे. यामुळे येत्या काही दिवसात बेळगावमध्ये एक सुसज्ज फ्लाईंग टेनिंग स्कूल सुरू होणार आहे.
देशांतर्गत विमान प्रवास करणाऱया प्रवाशांची संख्या झपाटय़ाने वाढत आहे. त्याच बरोबरीने वैमानिकांची गरज भासत आहे. देशात वैमानिकांची संख्या वाढावी या दृष्टीने केंद्र सरकारच्या नागरी उड्डाण मंत्रालयाच्यावतीने देशभरातील महत्त्वाच्या विमानतळांवर एफटीओ उभारण्याचा निर्णय घेतला. बेळगाव विमानतळाला 2 एफटीओंची मंजुरी मिळाली. खासगी टेनिंग कंपन्या सरकारी जागेवर प्रशिक्षण देणार आहेत. दिल्ली येथील रेडबर्ड तर बेंगळूर येथील समवर्धने या दोन कंपन्यांना एफटीओ मंजूर झाले. बांधा, वापरा आणि हस्तांतरित करा, या तत्त्वावर एफटीओची निर्मिती केली जात आहे.
5 हजार चौरस फुटांवर होणार हँगर
विमानतळाच्या मुख्य धावपट्टीपासून हँगरपर्यंत एअरक्राफ्टची ये-जा करण्यासाठी टॅक्सीट्रक उभारण्यात आला. एप्रिलअखेर टॅक्सीट्रकचे काम पूर्ण झाले. यानंतर आता बेंगळूर येथील समवर्धने प्रा. लि. ने हँगर उभारणीला सुरुवात केली आहे. निश्चित केलेल्या विमानतळाच्या जागेवर 5 हजार चौरस फूट जागेवर हँगर उभारणीला सुरुवात करण्यात आली.
येत्या काळात शेडची उभारणीही केली जाणार आहे. दिल्ली येथील रेडबर्ड संस्थेनेही एफटीओ सुरू करण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत.