फलाटाच्या कामाला गती : एकाच ठिकाणी प्रवाशांना उतरणे होणार सोयीस्कर : अनेक बसेस थांबण्याची सोय
प्रतिनिधी /बेळगाव
मध्यवर्ती बसस्थानकात प्रवाशांची गैरसोय दूर करण्यासाठी फलाट उभारला जात आहे. या कामाला गती आली असून लवकरच फलाटाचे काम पूर्ण होईल, असे दिसत आहे. मध्यवर्ती बसस्थानकाचा विकास स्मार्ट सिटीअंतर्गत साधला जात आहे. बसस्थानकाचे काम पूर्णत्वाकडे आले आहे. शिवाय बस वाहतूकही सुरू झाली आहे. त्याचबरोबर बसस्थानकाच्या आवारात फलाट उभारला जात आहे. त्यामुळे या ठिकाणी प्रवाशांची सोय होणार आहे.
बसस्थानकाचे काम 34 कोटीच्या निधीतून सुरू आहे. स्मार्ट बसस्थानक, फलाट, शौचालय, पार्किंग आणि इतर सुविधा उपलब्ध केल्या जाणार आहेत. बसस्थानक उभारले असले तरी अद्याप शौचालय आणि पार्किंगचे काम शिल्लक आहे. बसस्थानकाच्या आवारात सुसज्ज असे फलाट उभारले जात आहेत. त्यामुळे एकाच ठिकाणी प्रवाशांना उतरणे सोयीस्कर होणार आहे. शिवाय प्रवाशांसोबत असलेले साहित्यदेखील त्या ठिकाणी ठेवता येणार आहे, असे मोठे फलाट या ठिकाणी उभारले जात आहे. त्यामुळे एकाच वेळी अनेक बसदेखील या ठिकाणी थांबू शकतात.
बसस्थानकात कर्नाटक, महाराष्ट्र आणि गोवा राज्यांच्या बससाठी स्वतंत्र फलाट उभारण्यात आले आहेत. त्याचबरोबर बाहेरून येणाऱया प्रवाशांसाठी देखील एक स्वतंत्र फलाट उभारला जात आहे. बसस्थानकात येणाऱया बसेस या ठिकाणी प्रवाशांना उतरविणार आहेत. त्यानंतर प्रवाशांना आपली बस शोधण्यासाठी बसस्थानकात येणे सोयीस्कर होणार आहे. बसस्थानकाच्या आवारातच हे सुसज्ज आणि भव्य फलाट उभारले जात आहे. त्यामुळे विद्यार्थी, वृद्ध प्रवाशांची सोय होणार आहे.
बेळगाव विभागाला महाराष्ट्र आणि गोवा राज्य लागून असल्याने बेळगाव बसस्थानकात कर्नाटकबरोबर महाराष्ट्र आणि गोवा राज्यातील बसेसही येत असतात. त्यामुळे बसस्थानकात बसेसची संख्या अधिक आहे. प्रवाशांच्या सोयीखातर सुसज्ज असे फलाट उभारले जात आहेत. त्यामुळे प्रवाशांना एकाच ठिकाणी उतरणे देखील सोयीस्कर होणार आहे.