सहा महिन्यांत काम पूर्ण करण्याची कंत्राटदाराला सूचना : वेळेत काम पूर्ण होण्याबाबत आशंका
वार्ताहर /खानापूर
येथे मंजूर झालेल्या हायटेक बसस्थानक बांधकामाला अखेर सुरुवात झाली आहे. गेल्या तीन-चार दिवसांपासून बस आगाराच्या समोरील खुल्या जागेत आराखडय़ानुसार कामाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे आता हायटेक बसस्थानकाचा प्रश्न मार्गी लागणार आहे.
येत्या सहा महिन्यांमध्ये हायटेक बसस्थानकाचे काम पूर्ण करण्यासाठी कंत्राटदाराला सूचना करण्यात आल्या आहेत. त्यानुसार खानापूरच्या आमदार डॉ. अंजली निंबाळकर यांनी पाहणी करून समाधान व्यक्त केले. संबंधितांना कामाचा दर्जा व वेळेत काम पूर्ण करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.
साडेसहा कोटीचा निधी
या हायटेक बसस्थानकासाठी जवळपास साडेसहा कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. पण प्रत्यक्षात 2002 साली तत्कालीन आमदार कै. अशोकराव पाटील यांच्या प्रयत्नातून बसस्थानक मंजूर झाले. त्यानंतर या बसस्थानकाच्या सुविधेसाठी कोणतीच पावले उचलण्यात आली नाहीत. खानापूर तालुका विस्ताराने मोठा असल्याने खेडय़ापाडय़ात बस सुविधा पोहोचण्यासाठी हायटेक बसस्थानकाची नितांत गरज आहे. यामुळे गेल्या सात-आठ वर्षांपासून या हायटेक बसस्थानकासाठी प्रयत्न करण्यात आले. परंतु यश आले नव्हते.
मागील महिन्यात या हायटेक बसस्थानकाच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला होता. पण राजकीय हस्तक्षेपामुळे हायटेक बसस्थानकाच्या कामात अडसर येईल का, असा प्रश्न निर्माण झाला
होता.
निर्धारित वेळेत काम पूर्ण होईल?
अखेर आता या कामाला सुरुवात झाल्याने हायटेक बसस्थानक कामाचा प्रश्न मार्गी लागला आहे. एकीकडे कामाचा शुभारंभ झाला असला तरी मान्सून उंबरठय़ावर आहे. त्यामुळे निर्धारित वेळेत काम पूर्ण होईल का, याबाबत प्रवासी व जनतेतून साशंकता व्यक्त करण्यात येत आहे.