महात्मा फुले रोड परिसरातील प्रकार : मनपाकडे तक्रार करूनही दुर्लक्ष
प्रतिनिधी /बेळगाव
शहरात अनधिकृत विनापरवाना बांधकामांचे पेव वाढले असून याकडे महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे. सेटबॅक सोडणे बंधनकारक असताना सर्व नियम धाब्यावर बसवून बांधकाम करण्यात येत असल्याचे निदर्शनास येत आहे. सेटबॅक तर दूरच, चक्क नाल्याच्या भिंतीवरच बांधकाम करण्याचा प्रकार महात्मा फुले रोड परिसरात सुरू असल्याची चर्चा होत आहे. याबाबत मनपा अधिकाऱयांकडे तक्रार करूनही दुर्लक्ष करण्यात आल्याचा आरोप होत आहे.
महापालिकेच्या कारभाराचा आढावा घेण्यासाठी मागील आठवडय़ात जिल्हाधिकाऱयांनी बैठक घेतली होती. त्यावेळी अनधिकृत बांधकाम रोखण्याची सूचना करून नाल्यावरील अतिक्रमण आणि बफर झोनच्या जागेत बांधकाम होत असल्यास रोखण्याची सूचना केली होती. मात्र, जिल्हाधिकाऱयांच्या या बैठकीला आठवडादेखील झाला नाही, तोच शहरात नाल्याच्या भिंतीवरच बांधकाम होत असल्याचा प्रकार चव्हाटय़ावर आला आहे. महात्मा फुले रोड परिसरात नाला असून महापालिकेने या नाल्याचे बांधकाम केले आहे. नाल्यालगतच एका इमारतीचे बांधकाम सुरू असून बफर झोनची जागा सोडणे बंधनकारक आहे. मात्र, बफर झोन सोडण्याकडेदेखील कानाडोळा करण्यात आला आहे. इमारत बांधकाम परवाना घेताना इमारतीच्या बाजूने सेटबॅक सोडावे लागते. पण तेदेखील सोडण्यात आले नसल्याची तक्रार महापालिकेकडे करण्यात आली होती. मात्र याबाबत महापालिकेच्या अधिकाऱयांनी कोणतीच कारवाई केली नाही.
नाल्यावरील बांधकामाकडे दुर्लक्ष का?
सध्या शहरात अनधिकृत बांधकामे मोठय़ा प्रमाणात सुरू असून ती रोखण्याच्यादृष्टीने महापालिकेकडून कोणतीच कारवाई होताना दिसत नाही. पण सध्या याचा गैरफायदा घेऊन असंख्य इमारतधारक विनापरवाना आणि अनधिकृत बांधकाम करताना दिसत आहेत. महात्मा फुले रोडच्या नाल्यावरील बांधकामाकडे दुर्लक्ष का? असा मुद्दा परिसरातील नागरिक उपस्थित करीत आहेत.