पुणे / वार्ताहर :
Construction worker dies after falling from 14th floor बाणेरमधील पॅनकार्ड क्लब रोडवरील बहुमजली इमारतीच्या चौदाव्या मजल्यावरून खाली पडून एका बांधकाम मजुराचा मृत्यू झाला. याप्रकरणी पोलिसांनी ठेकेदारासह चौघांवर गुन्हा दाखल केला आहे.
श्याम नेमा रविदास (वय 22, नऱ्हे, पुणे) असे मृत्यू झालेल्या मजुराचे नाव आहे. याप्रकरणी ठेकेदार लज्जाराम गुजर, सुपरवायझर रामकिस गुजर, सेफ्टी ऑफिसर रवी गवंडे आणि अजिंक्य यांच्यावर चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. याबाबात श्याम यांचा भाऊ देवेंद्रकुमार यांनी तक्रार दिली आहे.
अधिक वाचा : गुजरात निवडणुकीनंतर राज्यपालांची उचलबांगडी?
बाणेर भागातील पॅनकार्ड रोडवर कल्पतरू जेड नावाच्या बहुमजली इमारतीचे बांधकाम सुरू आहे. या इमारतीच्या कामाचा ठेका लज्जाराम गुजरसह काहींनी घेतला आहे. दरम्यान, बांधकाम साईटवर श्याम हा फरशी बसविण्याचे काम करत होता. बुधवारी (दि.30) चौदाव्या मजल्यावरील ओपन बाल्कनीत श्याम फरशी बसविण्याचे काम करत असताना तो अचानक खाली कोसळला. यात गंभीर जखमी झाल्याने त्याचा मृत्यू झाला. दरम्यान इमारतीच्या ठेकेदार आणि सुपरवायझरने काम करताना कामगारांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीतून कोणतीही उपाययोजना न करता सेफ्टी बेल्ट व सुरक्षा जाळी न बसवता काम करण्यासाठी भाग पाडले. त्यांच्या निष्काळजीपणामुळे ही घटना घडली असल्याचा ठपका ठेवत त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.