Tarun Bharat

कोनवाळ गल्लीत दूषित पाणीपुरवठा

पाणी समस्या निवारणासाठी आठ वर्षांपासून प्रतीक्षा, मनपाच्या अधिकाऱयांविरोधात संताप : आठ दिवसात समस्येचे निवारण न केल्यास आंदोलन-रास्ता रोकोचा इशारा

प्रतिनिधी / बेळगाव

कोनवाळ गल्लीतील दूषित पाणीपुरवठय़ाबाबत 2014 पासून सातत्याने तक्रारी करण्यात आल्या आहेत. मात्र दुरुस्तीसाठी महापालिका प्रशासनाने कोणतीच कारवाई केली नाही. प्रशासनाच्या या बेजबाबदारपणाबद्दल रहिवाशांतून संताप व्यक्त करण्यात येत असून आठ दिवसांत समस्येचे निवारण न केल्यास कोनवाळ गल्ली मनपा कार्यालयासमोर धरणे आंदोलन छेडून रास्ता रोको करू, अशा इशारा देण्यात आला आहे.  

शहरात सध्या आठ दिवसांआड पाणीपुरवठा केला जात आहे. अशातही कोनवाळ गल्ली परिसरात दूषित पाण्याचा पुरवठा होत आहे. याबाबत येथील रहिवाशांनी महापालिका आणि पाणीपुरवठा मंडळाला दि. 28 मार्च 2014 रोजी निवेदन दिले होते. त्यानंतर सातत्याने पाठपुरावा केला होता. पण या निवेदनाची दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे दि. 2 मार्च 2021 रोजी येथील रहिवाशांच्यावतीने पुन्हा एकदा निवेदन देऊन दूषित पाणी समस्येचे निवारण करण्यासाठी विनंती केली. पण नागरिकांच्या या समस्येशी काहीच लेने देणे नाही, अशा अविर्भावात असणाऱया मनपाच्या अधिकाऱयांनी निवेदन केराच्या टोपलीत टाकले आहे. गेल्या आठ वर्षांपासून पाठपुरावा करूनही स्वच्छ पाणीपुरवठा करण्यात महापालिका प्रशासन अपयशी ठरले आहे. तसेच उच्च दाबाने पाणीपुरवठा होत नसल्याने या समस्येचे निवारण करण्याची मागणी वारंवार करण्यात आली होती. पण पाणीपुरवठा मंडळ, महापालिका आणि सध्या देखभाल करणाऱया एलऍण्डटी कंपनीने या समस्येकडे कानाडोळा केला आहे. मनपा अधिकाऱयांच्या दुर्लक्षाबद्दल संताप व्यक्त करण्यात येत असून आता आंदोलनासाठी रस्त्यावर उतरण्याचा निर्णय कोनवाळ गल्लीतील महिलावर्गांने घेतला आहे.

प्रतिक्रिया

अनेक दिवसांपासून दूषित पाणीपुरवठा

  • अंबिका गवळी

कोनवाळ गल्लीत गेल्या अनेक दिवसांपासून दूषित पाणीपुरवठा होत आहे. या समस्येचे निवारण करण्यासाठी रस्त्यावर खड्डा खोदण्यात आला. पण या समस्येचे निवारण झाले नाही. खड्डाही तसाच आणि समस्येचे निवारणही झाले नाही, प्रशासनाचे नेमके काय चालले आहे कळत नाही? असा प्रश्न कोनवाळ गल्ली येथील गृहिणी अंबिका गवळी यांनी उपस्थित केला. खोदण्यात आलेल्या खड्डय़ात लहान मुले पडण्याचा धोका आहे. तसेच दूषित पाण्यामुळे अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. सध्या पिण्यासाठी पाणी नसल्याने शुद्ध पाणी मिळेल त्या ठिकाणी जाऊन आणावे लागते. हे पाणी जनावरे देखील पित नाहीत. लहान मुले आणि वृद्ध नागरिकांना आजारांचा सामना करावा लागत आहे. कित्येकदा तक्रार करूनही अधिकारी दाद देत नाहीत. हा प्रकार म्हणजे अधिकाऱयांचा बेजबाबदारपणा आहे. येत्या आठ दिवसांत समस्यांचे निवारण करण्यात यावे, अन्यथा कोनवाळ गल्ली, कार्यालयासमोर मुलांबाळांसह धरणे आंदोलन छेडून रास्ता रोको करू, असा इशारा त्यांनी दिला.

खड्डय़ामध्ये उतरून पाणी भरण्याची वेळ

  • अशोक शिरोळकर

महापालिका प्रशासन सध्या ढिम्म बनले आहे. गेल्या आठ वर्षांपासून दूषित पाणीपुरवठय़ाबाबत तक्रार करीत आहोत. या समस्येचे निवारण करण्यासाठी अनेकवेळा निवेदन दिली. अधिकारी, लोकप्रतिनिधींकडे विनंत्या आर्जव केला, पण प्रशासनाला जाग आली नाही. येथील नागरिक आठ वर्षांपासून या समस्येचा सामना करीत आहेत. तसेच उच्च दाबाने पाणीपुरवठा होत नसल्याने खड्डय़ामध्ये उतरून पाणी भरण्याची वेळ नागरिकांवर आली आहे. त्यामुळे हे अधिकारी समस्येचे निवारण कधी करणार? असा प्रश्न अशोक शिरोळकर यांनी उपस्थित केला. महापालिका, पाणीपुरवठा मंडळ, एलऍण्डटी कंपनीचे अधिकारी आणि आमदारांनी देखील या समस्येची पाहणी केली. पण कारवाई मात्र शुन्य आहे. त्यामुळे या समस्येचे निवारण तातडीने करावे, अशी मागणी केली.

दूषित पाणी पिऊन नागरिक आजारी

  • गीता पाटील

कोनवाळ गल्लीतील प्रत्येक घरातील नळाला दूषित पाणी येत आहे. याबाबत तक्रार केली, पण याची दखल घेतली नाही. या समस्येचे निवारण करण्यासाठी खड्डा खोदला आहे. पण समस्येचे निवारण झाले नाही. या उलट या खड्डय़ामुळे समस्येत भर पडली आहे. नागरिकांच्या समस्येकडे प्रशासनाचे पूर्णपणे दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे आज दूषित पाणी पिऊन असंख्य नागरिक आजारी झाले आहेत. लहान मुले आणि वृद्धांना विविध आजारांचा सामना करावा लागत आहे. येथील भंगीबोळात देखील डेनेजवाहिन्या घालण्यासाठी देखील खोदाई केली आहे. पण रस्त्याची दुरुस्ती केली नाही. तर प्रत्येक समस्येकडे प्रशासनाच्या अधिकाऱयांनी दुर्लक्ष केले असल्याची टीका गीता पाटील यांनी केली.

नागरिकांनी कसे जीवन जगावे?

  • नंदा गवळी

गेल्या पंधरा दिवसांपूर्वी गल्लीतील रस्त्यावर खोदाई करण्यात आली. त्यामुळे दूषित पाण्याच्या समस्येचे निवारण होईल, असे वाटले. पण केवळ खोदाई करून कर्मचारी निघून गेले आहेत. दूषित पाण्याच्या समस्येचे निवारण झाले नाही. शाळेला जाणारी लहान मुले आहेत, जनावरे आहेत. त्यामुळे पिण्याचे पाण्याची समस्या निकालात काढणे गरजेचे होते. पण अधिकाऱयांनी दुर्लक्ष केले आहे. अशा स्थितीत नागरिकांनी कसे जीवन जगावे? असा प्रश्न नंदा गवळी यांनी उपस्थित केला. कधी पाण्याची समस्या तर कधी नाल्याच्या पाण्याची समस्या रहिवाशांना भेडसावते. या समस्यांचे निवारण करावे, अशी मागणी त्यांनी केली.

Related Stories

परिवहनचा दैनंदिन महसूल 65 लाखांवर

Amit Kulkarni

कंग्राळी खुर्द येथील रस्ताकामाला गती

Amit Kulkarni

बेळगाव-तिरुपती विमानफेरी स्टार एअरतर्फे सुरू

Amit Kulkarni

स्मार्ट सिटीची कामे मार्चपर्यंत पूर्ण करा

Patil_p

फिश मार्केटच्या विकासासाठी 50 लाखाचे अनुदान मंजूर

Patil_p

अबकारी खात्याच्या कार्यालयासमोर डेनेज चेंबर ओव्हरफ्लो

Amit Kulkarni