संभाजीनगर, वडगाव परिसरातील समस्या : महापालिकेकडे तक्रारी करूनही दुर्लक्ष


प्रतिनिधी /बेळगाव
शहरातील विविध भागात ड्रेनेजवाहिन्या खराब झाल्या असल्याच्या तक्रारी नेहमी होत असतात. विशेषत: उपनगरात ही समस्या मोठ्या प्रमाणात भेडसावत असून संभाजीनगर परिसरातील ड्रेनेजवाहिन्यांमुळे विहिरींचे पाणी दूषित झाले आहे. याबाबत महापालिकेकडे अनेकवेळा तक्रारी करूनही दुर्लक्ष करण्यात आल्याची टीका नागरिक करीत आहेत.
संभाजीनगर, वडगाव परिसरात ड्रेनेजवाहिन्यांची दुरवस्था झाली आहे. ठिकठिकाणी असलेल्या ड्रेनेजवाहिन्या तुंबल्या असल्याने सांडपाण्याचा निचरा व्यवस्थित होत नाही. त्यामुळे वडगाव परिसरातील रहिवाशांना दूषित पाण्याच्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे. वारंवार ही समस्या उद्भवत असल्याने परिसरातील रहिवासी हैराण झाले आहेत. येथील समस्येबाबत महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडे तक्रार केली होती. याची दखल घेऊन अधिकाऱ्यांनी आणि लोकप्रतिनिधींनी देखील पाहणी केली. पण पुढे कोणतीच कार्यवाही झाली नसल्याने समस्या जैसे थे आहे.
सांडपाण्याचा निचरा व्यवस्थित होत नसल्याने ड्रेनेज चेंबरमधून सांडपाणी पाझरत आहे. परिणामी संभाजीनगर परिसरातील विहिरींचे पाणी दूषित बनले आहे. त्यामुळे नागरिकांना दूषित पाण्याचा वापर करण्याची वेळ आली आहे.
नागरिकांचे आरोग्य धोक्यात
गेल्या महिन्याभरापासून ही समस्या निर्माण झाली असून तक्रार करूनही दखल घेतली जात नसल्याने संताप व्यक्त करण्यात येत आहे. नळांना सुरळीत पाणीपुरवठा केला जात नसल्याने विहिरींच्या पाण्याचा वापर करावा लागतो. दूषित पाण्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. येथील समस्येची पाहणी करून तातडीने निवारण करण्यात यावे, अशी मागणी होत आहे.