केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा निर्णय : ममता बॅनर्जी यांनाही निमंत्रण
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
केंद्रीय गृह मंत्रालयाने हरियाणाच्या सूरजकुंडमध्ये 27-28 ऑक्टोबर या कालावधीत सर्व राज्यांच्या गृहमंत्र्यांचे चिंतन शिबिर आयोजित केले आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी याकरता सर्व राज्यांच्या गृहमंत्र्यांना आमंत्रित केले आहे. या बैठकीसाठी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनाही आमंत्रित करण्यात आले आहे. ममता बॅनर्जी या पश्चिम बंगालमधील गृहखाते सांभाळत आहेत. ममतादीदी या बैठकीत सामील होणार की नाही हे अद्याप स्पष्ट नाही.
देशाच्या अंतर्गत सुरक्षेशी निगडित मुद्दे आणि समस्यांवर चर्चा करण्यासाठी गृह मंत्रालयाने दोन दिवसीय चिंतन शिबिर आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे. या चिंतन शिबिरात सर्वात प्रमुख मुद्दा अंतर्गत सुरक्षेचा असणार आहे. अंतर्गत सुरक्षेसह राज्यांची पोलीस व्यवस्था, नागरी सुरक्षा, अग्निशमन व्यवस्था आणि होमगार्डशी संबंधित मुद्दय़ांवरही मंथन केले जाणार आहे.
राज्यांसोबत परस्पर समन्वय आणि मदतीच्या आधारावर अंतर्गत सुरक्षेशी निगडित काही समस्या निकालात काढता येणार असल्याचे केंद्रीय गृह मंत्रालयाचे मानणे आहे.