Tarun Bharat

हिंदू देवतांची अवमानना निषेधार्ह

एका वृत्तवाहिनीच्या चर्चात्मक कार्यक्रमात भाग घेताना भारतीय जनता पक्षाच्या माजी प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी प्रेषित मोहम्मद यांच्यासंबंधाने काही विधाने केली आणि केवळ देशातच नव्हे, तर जगभरात निषेधाचे तीव्र सूर उमटण्याची घटना घडली आहे. भाजपने शर्मा यांना त्यांच्या पदावरुन दूर केले. त्यांच्या विरोधात देशात अनेक राज्यांमध्ये तक्रारी दाखल झाल्या आहेत. यासंबंधाने देशात वातावरण तापले असतानाच लीना मणिमेकलाई या महिलेने तिच्या बोधपटाचे पोस्टर प्रसिद्ध केले आहे, ते बरेच वादग्रस्त ठरले आहे. या पोस्टरमध्ये कालीमाता ही देवता धूम्रपान करताना आणि हाती ‘एजीबीटीक्यू’ (तृतीयपंथीय) यांच्या संबंधातील झेंडा हाती घेतलेल्या स्थितीत दाखविण्यात आलेली आहे. त्यामुळे मणिमेकलाई यांच्या विरोधातही अनेक तक्रारी दाखल झाल्या आहेत. या पोस्टरमुळेही आधीच तणावग्रस्त असलेल्या वातावरणात भर पडली आहे. तृणमूल काँगेसच्या खासदार महुआ मोईत्रा यांनी मणिमेकलाई यांचे अप्रत्यक्ष समर्थन केल्याने आगीत तेल ओतले गेले असून त्यांच्या पक्षालाही त्यांच्या विधानांवर हात झटकावे लागले. मणिमेकलाई यांनी जे केले ते पहिल्यांदाच घडते आहे असे नाही. आपल्या देशात स्वतःचे तथाकथित पुरोगामित्व सिद्ध करण्यासाठी अनेक अर्धवट पुरोगामी हिंदू देवदेवतांच्या मूर्ती, त्यांच्या कथा आणि पुराणकालीन प्रसंग यांचा यथेच्छ आणि विकृत पद्धतीने उपयोग करतात. अशा अनेक घटना घडलेल्या आहेत. या लोकांचे एक वैशिष्टय़ असते, ते असे की, त्यांना त्यांच्या बाष्कळ आणि अर्थहीन पुरोगामित्वाला प्रसिद्धी मिळवून देण्यासाठी हिंदूंच्या देवदेवतांचे अशा प्रकारे विकृतीकरण करावे लागते. इतर कोणत्याही धर्माच्या प्रतिकांना, व्यक्तीरेखांना किंवा देवतेवतांना हात लावण्याची त्यांची हिंमत होत नाही. कारण तसे केल्यास प्राणाशी गाठ असते, हे त्यांना माहित असते. पुरोगामित्वाची किंवा धर्मनिरपेक्षतेची कमतरता केवळ हिंदू समाजात किंवा हिंदू धर्मातच आहे असे मुळीच नाही. सर्वच धर्मांमध्ये ती कमतरता असते. तथापि, भारत हा सर्व धर्मांचा आणि सर्व धर्मियांचा देश आहे, अशी भाषा करणारे पुरोगामी हिंदू धर्मावर तुटून पडताना दिसतात. यातून त्यांची पक्षपाती आणि भेकड मनोवृत्ती स्पष्ट होते. तसे पाहू गेल्यास हिंदू धर्म इतर अनेक धर्मांच्या तुलनेत अधिक उदार आहे. ऐतिहासिक काळापासून हिंदू धर्मात कालमानानुसार परिवर्तन होत आलेले आहे आणि तो एकाच नियमावलीनुसार चालणारा एकांगी धर्म नाही, ही बाब जवळपास प्रत्येक धर्माभ्यासकाने मान्य केलेले आहे. धर्माच्या चालीरीती न मानण्याचे आणि तरीही धर्मातच राहण्याचे स्वातंत्र्य हिंदू धर्मात आहे. त्यामुळे असे स्पष्टपणे दिसून येते की, हिंदू धर्माची ठेवण आणि स्वरुप हे ‘धर्मनिरपेक्षता’ या संकल्पनेशी पुष्कळसे जवळचे आहे. ही वस्तुस्थिती असताना अनेक पुरोगाम्यांना त्यांचा कथित पराक्रम दाखविण्यासाठी हिंदूंच्या धर्मभावना दुखावणे, हिंदू धर्माच्या प्रतिकांची आणि चालीरितींची खिल्ली उडविणे आणि हे करत असताना हिंदूंनाच धर्मनिरपेक्षतेचे डोस पाजणे, हे करावे लागते. यातून या पुरोगाम्यांची हिंदू धर्माची समज किती अत्यल्प आहे हे उघड होते. हिंदू समाज हा पुष्कळ प्रमाणात सोशिक आहे. सहसा तो त्याच्या धर्माचा अपमान झाल्यास खवळून उठत नाही. काही अपवादात्मक घटना वगळल्यास सहसा हिंदू धर्म निंदकांना हिंदू समाज धडा शिकवत नाही. जरी कोणी असे प्रकार केले तरी हिंदू समाजच अशा व्यक्तींच्या विरोधात उभा राहतो. त्यामुळे हिंदू धर्माचा अपमान करणाऱयांनाही हिंदू समाजच संरक्षण देतो असे दिसून येते. खरे पाहता यासाठी स्वतःला पुरोगामी समजणाऱयांनी हिंदू समाजाचे आभार मानावयास हवेत. किमानपक्षी हिंदू समाज आणि हिंदू धर्म यांच्यासंबंधात त्यांनी कृतज्ञ असावयास हवे. पण या पुरोगाम्यांची मानसिकता उलटीच आहे. ज्या फांदीवर ते सुखाने बसले आहेत, तीच तोडण्याची त्यांची चाललेली धडपड पाहिली की कित्येकदा त्यांची दया आल्याशिवाय रहात नाही. ‘बुद्धीहीन’ बुद्धीवाद कसा असतो, याचे उत्कृष्ट उदाहरण म्हणजे हे कथित पुरोगामी आहेत. ‘हिंदुत्व म्हणजे भारत नव्हे’ अशी दर्पोक्ती हे पुरोगामी उच्चारवाने करतात. असे जर आहे तर केवळ हिंदुत्व किंवा त्याची श्रद्धास्थाने यांनाच लक्ष्य का बनविले जाते ? यांच्या म्हणण्यानुसार ‘हिंदुत्वा’ पलीकडचा जो भारत आहे, त्या भारतामधूनही त्यांना त्यांच्या पुरोगामित्वाचा प्रसार आणि प्रचार करण्यासाठी भरपूर जागा मिळू शकते. तसेच खिल्ली उडविण्यासाठी  हिंदुत्वाबाहेरच्या भारतातूनही त्यांना अनेक साधने उपलब्ध होऊ शकतात. पण तसे करण्याचे धाडस त्यांच्यात नाही. कारण परिणाम काय होईल याची त्यांना जाणीव आहे. त्यामुळे स्वतःची कातडी बचावत जितकी जमेल तितकी क्रांती करायची आणि तिचे श्रेय उपटायचे, हा या लोकांचा ‘धर्म’ आहे. साहजिकच, हिंदू धर्म तो मानणारा हिंदू समाज हे त्यांचे ‘टार्गेट’ आहे. पण या प्रकारातून एक धोका संभवतो. प्रत्येक धर्माच्या समाजाच्या सहनशीलतेची एक मर्यादा असते. हे हिंदू धर्माच्या संदर्भातही खरे आहे. या मर्यादेशी जर अमर्याद खेळ केला तर तो आगीशी खेळ केल्याचा प्रकार ठरु शकतो. हिंदू समाजाच्या सहनशीलतेची अशी विनाकारण परीक्षा पाहिली गेली तर तो समाजच कट्टरतावादी होण्याची शक्यता आहे. तसे झाल्यास सर्व पुरोगाम्यांना आणि धर्मनिरपेक्षतावाद्यांना त्यांची दुकाने बंद केल्यावाचून गत्यंतर राहणार नाही. जो पर्यंत हिंदू समाज बहुसंख्येने आहे, तसेच आपल्या मर्यादेत आहे, तोपर्यंतच भारतात धर्मनिरपेक्षतेची आणि पुरोगामित्वाची ही सोंगे सुरु राहतील, याची पुरेपूर जाणीव या कथित पुरोगाम्यांनी ठेवणे आवश्यक आहे. हे भान न ठेवल्यास हानी त्यांचीच आहे. तेव्हा सवंग प्रसिद्धीसाठी आणि असलेल्या अगर नसलेल्या पुरोगामित्वाची हौस भागविण्यासाठी त्यांनी हिंदू धर्म, त्याची प्रतिके आणि देवतेवता यांची घाऊक अवमानना करण्याचा त्यांचा आवडता धंदा सोडून द्यावा. हे त्यांच्यासाठीच पुष्कळ हिताचे आहे.

Related Stories

भाजपमध्ये हायकमांडचे प्रस्थ वाढू लागले

Patil_p

कोरोनामुळे मंदावलेल्या अर्थचक्राला कर्जाचे वंगण

Tousif Mujawar

‘टोल’ धाड संपणार का?

Patil_p

आजचा आगळा वेगळा 15 ऑगस्ट

Patil_p

रुततात काटे येथे, आक्रंदतात युवा

Patil_p

सर्वोच्च न्यायालयात पश्चिम घाटासाठी याचिका

Patil_p