कॅन्टोन्मेंटच्या ई-छावणी प्रणालीद्वारे अर्ज करण्याचे आवाहन : अटी-नियमांचे पालन करणे बंधनकारक
प्रतिनिधी /बेळगाव
कॅन्टोन्मेंट बोर्ड हद्दीतील लीजकराराच्या कायद्यात संरक्षण खात्याकडून नव्या तरतुदी करण्यात येत आहेत. त्यामुळे लीजकरार वाढविण्यात आला नव्हता. मात्र कायद्याच्या दुरूस्तीचा प्रस्ताव मंजुरीच्या प्रतीक्षेत असल्याने लीजकरार एक वर्षाच्या कालावधीसाठी वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याकरिता ई-छावणी प्रणालीवर अर्ज करण्याचे आवाहन कॅन्टोन्मेंटच्यावतीने करण्यात आले आहे.
कॅन्टोन्मेंट बोर्डचे कामकाज ब्रिटिशकालीन कायद्यानुसार करण्यात येत आहे. त्यामुळे या कायद्यात नव्या तरतुदी करण्याचा निर्णय संरक्षण खात्याने घेतला आहे. त्याकरिता प्रस्ताव संसदेकडे पाठविण्यात आला आहे. तसेच कॅन्टोन्मेंट अॅक्ट 2006 मध्येदेखील नव्या तरतुदी करण्यात येणार आहेत. असे विविध प्रस्ताव मंत्रिमंडळाच्या मंजुरीसाठी ठेवण्यात आले आहेत. तसेच भाडेकरारातदेखील काही बदल करण्याचा प्रस्ताव आहे. कॅन्टोन्मेंट हद्दीतील जागांची मालकी संरक्षण खात्याची आहे. मात्र त्याठिकाणी बांधण्यात आलेल्या इमारती, बंगले आणि मालमत्ता मालकीच्या आहेत. संरक्षण खात्याने बहुतांश जागा लीजकराराने दिल्या आहेत. यापैकी काही मालमत्ताधारकांच्या लीजकराराची मुदत दि. 31 डिसेंबर 2022 रोजी संपली आहे. मात्र कायद्यातील नव्या तरतुदीमुळे लीजकरारात वाढ करण्यात आली नव्हती. लीजकरार वाढीसाठी नागरिकांनी कॅन्टोन्मेंट बोर्डकडे विचारणा केली होती. पण नव्या तरतुदी झाल्यानंतरच लीजकरार वाढीचा निर्णय घेतला जाईल, असे सांगण्यात आले. त्यामुळे मालमत्ताधारकांना लीजकरार वाढवून देण्यात आला नव्हता.
मात्र लीजकरार कायद्यातील नव्या तरतुदीचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला नाही. हा प्रस्ताव मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे. काही मालमत्तांच्या लीजकराराची मुदत दि. 31 डिसेंबर 2022 रोजी संपली आहे. त्यामुळे त्यांना एक वर्ष किंवा लीजकरार कायद्याच्या मंजुरीपर्यंत लीजवाढ देण्याचा निर्णय संरक्षण खात्याने घेतला आहे. अटी व नियमांचे पालन करणे बंधनकारक असेल. त्याकरिता कॅन्टोन्मेंटच्या ई-छावणी या प्रणालीवर अर्ज करण्याचे आवाहन संरक्षण खात्याने केले आहे.
लीजवाढीसाठी ऑनलाईनद्वारे अर्ज करण्याची सूचना करण्यात आली असून अर्ज करून भाडेपट्टी भरणा न केल्यास कायदेशीर कारवाई करून लीजवाढ रद्द केला जाईल, असा इशारा कॅन्टोन्मेंटच्यावतीने प्रसिद्धीपत्रकाद्वारे देण्यात आला आहे.