बसथांबा-एलईडी जाहिरात फलकाच्या माध्यमातून मनपाला मिळणार 25 लाखांचा महसूल
प्रतिनिधी / बेळगाव
शहरातील बसथांब्यांवर जाहिराती लावण्यासाठी लिलाव आयोजित केला होता. महापालिकेने निश्चित केलेल्या रकमेपेक्षा 15 हजार रुपये अधिक बोली लावण्यात आली असून 39 बसथांब्यांवर जाहिराती लावण्यासाठी 9 लाख 90 हजार रुपये बोली लागली आहे. तर विविध चौकांतील चार एलईडी जाहिरांतीसाठी 14 लाख 55 हजार रुपये बोली लावण्यात आली आहे. त्यामुळे बसथांब्यांवरील जाहिरात फलकाच्या लिलावाला अखेर प्रतिसाद मिळाला आहे.
महापालिकेच्यावतीने आणि स्मार्ट सिटी योजनेंतर्गत स्मार्ट बसथांब्यांची उभारणी करण्यात आली आहे. विविध ठिकाणी 39 बसथांबे असून या ठिकाणी बॅकड्रॉपवरती जाहिराती लावता येवू शकतात. तसेच स्मार्ट सिटी योजनेंतर्गत विविध चौकात एलईडी जाहिरात फलक उभारण्यात आले आहेत. जाहिराती लावण्याचे कंत्राट देण्यासाठी महापालिकेने यापूर्वी दोन वेळा लिलाव प्रक्रिया राबविली होती. मात्र लिलाव प्रक्रियेला प्रतिसाद लाभला नाही.
मंगळवारी तिसऱ्यांदा लिलाव प्रक्रिया आयोजित करण्यात आली होती. 39 बसथांब्यांवर जाहिरात फलक लावण्यासाठी महापालिकेने 9 लाख 75 हजार रुपये भाडे निश्चित केले होते. या लिलाव प्रक्रियेत तिघांनी सहभाग घेतला होता. बोली वेळी 9 लाख 90 हजार रुपये सर्वाधिक बोली लावण्यात आली. एलईडी जाहिरात फलकाच्या लिलाव प्रक्रियेत तिघांनी बोली लावली होती. महापालिकेने 14 लाख 40 हजार रुपये भाडे निश्चित केले होते. बोलीवेळी 14 लाख 55 हजार सर्वाधिक बोली लावण्यात आली. त्यामुळे बसथांब्यांवरील जाहिरात फलकांसह एलईडी जाहिरात फलकांच्या माध्यमातून महापालिकेला वर्षाला 24 लाख 45 हजार रुपये भाडे मिळणार आहे.
लिलाव प्रक्रियेवेळी महसूल उपायुक्त प्रशांत हनगंडी, महसूल अधिकारी संतोष अनिशेट्टर, चंद्रू मुरारी आदींसह मनपाचे अधिकारी उपस्थित होते.