Tarun Bharat

जाहिरात फलकांच्या कारवाईला कंत्राटदारांचा आक्षेप

गोगटे चौकातील फलक हटविण्यास विरोध : पॅन्टोन्मेंट कर्मचारी-जाहिरात कंत्राटदारांमध्ये वादावादी, पोलीस संरक्षणात कारवाई

बेळगाव ; शहरातील जाहिरात फलकांमुळे वाद निर्माण होत असल्याने संपूर्ण जाहिरात फलक हटविण्याची सूचना करण्यात आली आहे. कॅन्टोन्मेंटकडून जाहिरात फलक हटविण्याची मोहीम राबविण्यात येत आहे. मात्र जाहिरात फलक हटविण्यास जाहिरात कंत्राटदारांनी आक्षेप घेतला. त्यामुळे रविवारी सकाळी गोगटे चौक परिसरात पॅन्टोन्मेंट कर्मचारी व जाहिरात कंत्राटदारांमध्ये वाद निर्माण झाला. निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर जाहिरात फलक आणि विविध जाहीरनाम्याच्या जाहिराती लावण्यासाठी चढाओढ वाढली आहे. शहरातील विविध चौक, प्रमुख रस्त्याशेजारी मोठमोठे जाहिरात फलक लावण्यात येत आहेत. धोकादायक पद्धतीनेदेखील जाहिरात फलक उभारल्याचे निदर्शनास आले आहे. शुभेच्छा फलक तसेच अनधिकृत जाहिरात फलक हटविण्याची मोहीम मनपाच्यावतीने राबविण्यात आली. मात्र काही राजकीय व्यक्तींच्या जाहिरात फलकांमुळे वाद निर्माण झाले होते. निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर आमिषे दाखविणारे जाहिरात फलक हटविण्याचा आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी बजाविला होता. त्यानुसार महापालिकेने शुक्रवारपासून जाहिरात फलक हटविण्याची मोहीम हाती घेतली होती. त्याचप्रमाणे शनिवारी

कॅन्टोन्मेंटकडूनदेखील जाहिरात फलक हटविण्याची कारवाई केली. संचयनी चौक ते गोगटे चौक परिसरात रस्त्याशेजारी मोठमोठे जाहिरात फलक उभारण्यात आले आहेत. पावसाच्या वाऱ्यामुळे मागीलवर्षी काही जाहिरात फलक कोसळले होते. सदर फलकदेखील हटविण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी कॅन्टोन्मेंट बोर्डला केली होती. त्यामुळे शुक्रवारपासून जाहिरात फलक आणि त्यासाठी उभारलेल्या लोखंडी फ्रेम मुळासकट हटविण्याची कारवाई पॅन्टोन्मेंटकडून करण्यात आली. शनिवारी संचयनी चौकातील तसेच खानापूर रोड शेजारील जाहिरात फलक गॅस कटरने हटविण्यात आले. उर्वरित जाहिरात फलकच्या फ्रेम हटविण्याची कारवाई रविवारी सकाळपासून हाती घेण्यात आली. गोगटे चौक परिसरात असलेले जाहिरात फलक हटविण्यात येत असताना काही जाहिरात कंत्राटदारांनी कारवाईस आक्षेप घेतला. जाहिरात फलकांचे शुल्क कॅन्टोन्मेंट बोर्डला भरले असतानादेखील फलक का हटविण्यात येत आहेत, असा मुद्दा कंत्राटदारांनी उपस्थित केला. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार फलक हटविण्याची मोहीम राबविल्याचे कॅन्टोन्मेंट अधिकाऱ्यांनी सांगितले. याबाबतचा आदेश दाखविण्याची मागणी कंत्राटदारांनी केली. जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश दाखविल्यानंतरच फलक हटविण्यात यावेत, असा आग्रह कंत्राटदारांनी धरला. मात्र यावेळी पॅन्टोन्मेंटच्या अधिकाऱ्यांनी पोलीस स्थानकाशी संपर्क साधून पोलीस संरक्षणात ही कारवाई राबविली. व रस्त्याशेजारी असलेले जाहिरात फलकचे फ्रेम व जाहिरात फलक हटविण्याची कारवाई केली. यावेळी कंत्राटदार व कॅन्टोन्मेंटचे अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये वादावादी झाली. कॅन्टोन्मेंटने बहुतांश जाहिरात फलकांवर कारवाईचा बडगा उगारला.

Related Stories

जिल्हय़ात 233 ग्रा. पं. स्मशानभूमीविना

Amit Kulkarni

हजारोंच्या उपस्थितीत सीमोल्लंघन

Amit Kulkarni

दीपक नार्वेकर बीपीसी 14 वर्षाखालील क्रिकेट स्पर्धा 6 जानेवारीपासून

Patil_p

तिसऱया रेल्वेगेटवर गर्डर बसविण्यास प्रारंभ

Amit Kulkarni

वास्तववादी जीवनाचा स्वीकार करा

Amit Kulkarni

रेसकोर्स परिसरातील शाळा गजबजल्या

Amit Kulkarni
error: Content is protected !!