प्रतिनिधी /फोंडा
फोंडा उपजिल्हा इस्पितळातील डॉक्टर्स व कर्मचाऱयांतर्फे आंतरराष्ट्रीय योगदिन फोंडय़ातील मंदिरे व ऐतिहासिक स्थळांच्या सानिध्यात साजरा करण्यात आला. कवळे येथील श्री शांतादुर्गा मंदिर, श्री कपिलेश्वरी मंदिर तसेच फर्मागुडीच्या किल्ल्यावर रम्य अशा जागा निवडून योगसत्रे घेण्यात आली.
महिला व पुरुष कर्मचारी मिळून साधारण 25 ते 30 जणांच्या तुकडीने फोंडय़ातील काही सौंदर्यस्थळांवर योगासने व प्राणायम करून योगदिन साजरा केला. उपजिल्हा इस्पितळाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. जयश्री मडकईकर यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. सुभाष वेळीप यांनी या योगसत्रांचे नियोजन केले. मुख्य सत्र इस्पितळाच्या सभागृहात झाले. यावेळी वैद्यकीय कर्मचाऱयांनी विविध आसनांची प्रात्यक्षिके सादर केली.