मुंबई
भारतातील शहरी भागामध्ये नियमित वेतनावर काम करणाऱ्या महिलांचा वाटा हा कमी झाला असल्याची माहिती समोर आली आहे. पीरियॉडिक लेबर फोर्स सर्वे यांच्या पाहणीमध्ये ही बाब समोर आली आहे.
आर्थिक वर्ष 2024 च्या सप्टेंबर तिमाहीमध्ये नोकऱ्यांमध्ये महिलांचे प्रमाण पाहता नीचांकी स्तर गाठल्याचे पाहायला मिळाले आहे. बऱ्याचशा कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना ऑफिसमध्ये काम करण्यास बोलावले असल्याने तसे घडले असल्याचेही सांगितले जात आहे. आर्थिक वर्ष 2024 च्या दुसऱ्या तिमाहीमध्ये नियमित वेतनावर काम करणाऱ्या महिलांच्या प्रमाणामध्ये घसरण होऊन ते 52.8 टक्क्यांवर आले आहे. वर्ष 2024 च्या पहिल्या तिमाहीमध्ये हे प्रमाण 54 टक्के होते. गेल्या सहा वर्षाचा विचार करता सप्टेंबर तिमाहित महिलांची घटलेली संख्या ही लक्षणीय मानली जात आहे. 2011 आर्थिक वर्षात पहिल्या तिमाहीत महिलांची भागीदारी 61 टक्के इतकी होती.
स्वयंरोजगारात वाटा वाढला
पण दुसरीकडे स्वयंरोजगार करू इच्छिणाऱ्या महिलांचा वाटा मात्र वाढलेला दिसून आला आहे. आर्थिक वर्ष 2024 च्या पहिल्या तिमाहीमध्ये 39.2 टक्के इतके प्रमाण होते. तेच दुसऱ्या तिमाहीमध्ये 40.3 टक्के इतके झाले.