पालक व ग्रामस्थ विरोधावर ठाम : महालक्ष्मी हायस्कूल पा.शि.संघाच्या सभेत जोरदार विरोध : लेखी निवेदन सादर करण्याचा निर्णय
प्रतिनिधी /फोंडा
sतळावली येथील सरकारी प्राथमिक शाळेच्या आवारात उभारण्यात येणाऱया मोबाईल टॉवरला पालक व ग्रामस्थांचा प्रखर विरोध असतानाही सध्या या टॉवरचे काम जोरात सुरु आहे. येत्या आठ दिवसांत हा टॉवर उभा राहण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमिवर रविवारी श्री महालक्ष्मी इंग्लीश हायस्कूल व प्राथमिक विभागाच्या पालक शिक्षक संघाची विशेष सभा झाली. त्यात सर्व पालकांनी प्राथमिक शाळा व हायस्कूलपासून दूर दुसऱया जागी हा टॉवर उभारण्याची जोरदार मागणी केली.
सर्व पालकांची स्वाक्षरी घेऊन एक लेखी निवेदन शिक्षण खाते, भागशिक्षणाधिकारी, सार्वजनिक बांधकाम खाते, जिल्हाधिकारी, ग्रामपंचायत व इतर संबंधीतांना सादर करण्याचा निर्णय या विशेष सभेत झाला. टॉवर दुसऱया जागेत हलविण्याची मागणी करणारे हे निवेदन येत्या दोन दिवसांत संबंधीत खात्यांना सादर करण्यात येणार असल्याची माहिती महालक्ष्मी हायस्कूलचे व्यवस्थापक शाणुदास सावंत यांनी सभेनंतर प्रसार माध्यमांशी बोलताना दिली. यावेळी पालक शिक्षक संघाचे अध्यक्ष विवेक बोरकर व पालक सदस्य ओंकार फडते हे उपस्थित होते. महालक्ष्मी हायस्कूल, पूर्व प्राथमिक व प्राथमिक शाळा मिळून चारशेहून अधिक विद्यार्थी या शाळेत शिकत आहेत. नियोजित टॉवर महालक्ष्मी हायस्कूलपासून अवघ्या पन्नास मिटर्सच्या अंतरावर आहे. हायस्कूल व प्राथमिक विभागाच्या पालकांनी टॉवरपासून मुलांच्या आरोग्याला धोका असल्याची भूमिका घेत, तो गावातच पण दुसऱया जागी उभारण्यात यावा, अशी जोरदार मागणी सभेत केली. ही मागणी धुडकावून त्याच ठिकाणी टॉवर उभारला गेल्यास पुढील शैक्षणिक वर्षांपासून मुलांना दुसऱया शाळेत पाठविण्याचा विचार करावा लागेल, असा इशाराही काही पालकांनी दिला आहे. हायस्कूल व्यवस्थापनाने आमचा टॉवरला विरोध नाही, पण तो शाळेपासून लांब दुसऱया जागेत उभारावा, अशी भूमिका घेतली आहे.
ज्या सरकारी प्राथमिक शाळेच्या आवारात हा टॉवर उभारला जात आहे, ती शाळा महालक्ष्मी हायस्कूलच्या शाळा समुहात येते. या शाळेत इयत्ता पहिली ते चौथी पर्यंत वर्ग भरत असून बाजूच्या खोलीत बालवाडी व अन्य एका खोलीत लोकविश्वास संस्थेचे वर्ग चालतात. शाळेच्या आवारात अगदी इमारतीला लागून हा टॉवर उभारला जात असल्याने सरकारी प्राथमिक शाळेच्या पालकांनीही सुरुवातीपासून त्याला जोरदार विरोध केला आहे. टॉवर दुसऱया जागेत हलविला न गेल्यास मुलांना शाळेत पाठविणे बंद करावे लागेल, असा इशारा पालकांनी दिला आहे. नियोजित टॉवरच्या सभोवताली दाट लोकवस्ती असून जवळपास राहणाऱया ग्रामस्थांनीही टॉवरपासून धास्ती घेतली आहे. गावातील काही नागरिकांनी आपली खासगी जागा टॉवरसाठी देऊ केली आहे. त्यामुळे टॉवर दुसऱया जागेत हलविण्याचा पर्याय आहे, असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.