अतिरिक्त पोलीस महासंचालकांची मध्यस्थी
प्रतिनिधी /बेळगाव
पत्रकारांना एकेरी बोलून अरेरावी करणाऱ्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांमुळे शुक्रवारी सुवर्ण विधानसौध समोरील आंदोलन स्थळावर वादावादीचा प्रकार घडला. वार्तांकनासाठी गेलेल्या पत्रकारांनाच दमदाटी केल्याने पत्रकार व पोलिसांमध्ये जोरदार वादावादी झाली. अखेर राज्याचे अतिरिक्त पोलीस महासंचालक अलोककुमार यांनी मध्यस्थी करत या प्रकरणावर पडदा टाकला. परंतु काहीवेळ या ठिकाणी गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती.
एकीकडे अधिवेशन सुरू असले तरी दुसरीकडे आपल्या विविध मागण्यांसाठी राज्यभरातील विविध संघटना आंदोलन करत आहेत. दररोज वेगवेगळ्या संघटना आंदोलन करीत असल्याने त्याचे वार्तांकन करण्यासाठी वृत्तपत्र व वाहिन्यांचे पत्रकार या ठिकाणी जात आहेत. परंतु शुक्रवारी वार्तांकनासाठी जाणाऱ्या पत्रकारांना पोलिसांनी अरेरावी केली. एका ज्येष्ठ पत्रकाराला एकेरी अर्वाच्य शब्दात बोलल्यामुळे वादाला तोंड फुटले.
पत्रकारांसाठी माहिती खात्याकडून ओळखपत्रे देण्यात आली आहेत. पोलिसांनी विचारल्यानंतर ती दाखविण्यात येतात. परंतु शुक्रवारी पोलिसांच्या अर्वाच्य शब्दामुळे पत्रकार व पोलिसांमध्ये वादावादी झाली.
अखेर राज्याचे अतिरिक्त पोलीस महासंचालक आलोककुमार यांनी घटनास्थळी पोहोचत संबंधित अधिकाऱ्याची इतरत्र ड्युटी लावली. यामुळे या प्रकरणावर अखेर पडदा पडला.