Tarun Bharat

परिवर्तित गॅस शवदाहिनीचे काम अर्धवट

खर्ची घातलेला निधी वाया, गत दोन वर्षांपासून वापराविना शवदाहिनी धूळखात पडून, धुरांडी बदलण्याची गरज

प्रतिनिधी /बेळगाव

सदाशिवनगर स्मशानभूमीत डिझेलवर चालणारी शवदाहिनी बसविण्यात आली होती. मात्र इंधन जास्त लागत असल्याच्या कारणास्तव गेल्या दोन वर्षापासून शवदाहिनी धूळखात पडली होती. नागरिकांच्या पाठपुराव्यानंतर गॅसवर चालणाऱ्या शवदाहिनीमध्ये परिवर्तन करण्यात आले. तरीदेखील शवदाहिनीचा तिढा सुटला नाही. या शवदाहिनीचा धूर जात नसल्याने आता धुरांडी (चिमणी) बदलण्याची आवश्यकता आहे.

महापालिकेच्या अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे डिझेल शवदाहिनीचा बोजवारा उडाला आहे. निविदा मंजूर करताना वर्कडन प्रमाणपत्र घेतले जाते. पण शवदाहिनीच्या उभारणीवेळी हे पत्र घेण्यात आले होते का? असा मुद्दा उपस्थित झाला आहे. डिझेलवर चालणाऱ्या शवदाहिनीच्या उभारणीसाठी महापालिकेने 45 लाखांहून अधिक निधी खर्च केला होता. शवदाहिनी उभारणीसाठी तब्बल दोन वर्षांच्या अवधी लागला. पण त्यानंतरही शवदाहिनीचे काम पूर्ण झाले नाही.

शवदाहिनी तयार झाल्यानंतर एका अंत्यविधीसाठी तब्बल 60 लिटरांहून अधिक डिझेल लागले. तसेच 5 तासांहून अधिक वेळ लागला. त्यामुळे शवदाहिनी वापराविना धूळखात पडून होती. सध्या शहरात गॅसवाहिन्या घालण्यात आल्या असून शवदाहिनीचे परिवर्तन गॅसवर चालणाऱ्या शवदाहिनीमध्ये करण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला. सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर 8 लाखांच्या निधीची तरतूद करून गॅसवर चालणाऱ्या शवदाहिनीमध्ये परिवर्तन करण्यात आले.

बसविण्यात आलेले बर्नर बदलून शवदाहिनीमध्ये किरकोळ बदल करण्यात आले. तसेच प्रायोगिक तत्त्वावर अंत्यविधी करण्यात आला. केवळ 18 किलो गॅस आणि दोन तासांचा वेळ अंत्यविधीसाठी लागला. पण अंत्यविधीवेळी निघणारा धूर धुरांडीमधून जात नसल्याचे निदर्शनास आले आहे. डिझेल शवदाहिनी उभारताना बसविण्यात आलेली धुरांडी लहान आकाराची आहे. त्यामुळे अंत्यविधी चौथऱ्यामधून धूर बाहेर पडत आहे. आता धुरांडी बदलण्याची गरज असल्याचे तज्ञ मंडळींकडून सांगण्यात आले आहे. परिणामी परिवर्तन केलेली गॅस शवदाहिनी देखील आता धूळखात पडली आहे.

डिझेल शवदाहिनीचे परिवर्तन गॅस शवदाहिनीमध्ये करण्याचे काम मेघा गॅस एंटरप्रायजेसच्यावतीने करण्यात आले. पण धुरांडी बदलण्यासाठी निधी नसल्याने याबाबतची सूचना महापालिकेला करण्यात आली आहे. महापालिकेकडे निधी उपलब्ध झाल्यानंतर आता धुरांडी बदलण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. आजवर महापालिकेच्या अभियंत्यांनी केलेल्या दुर्लक्षामुळेच डिझेलवर चालणारी शवदाहिनी धूळखात पडली आहे. याकरिता आतापर्यंत 60 लाखांहून अधिक निधी खर्च करण्यात आला आहे. तरीदेखील हा प्रकल्प कार्यान्वित झाला नाही. त्यामुळे खर्ची घातलेला निधी वाया गेला असल्याचा आरोप नागरिक करीत आहेत.

Related Stories

पंजाब नॅशनल बँकेतर्फे मुतगे शाळेत साहित्य वितरण

Amit Kulkarni

मंडय़ा येथे तीन पुजाऱयांची हत्या

Patil_p

जाधवनगरमधील ‘त्या’ मैदानावरील अवैध प्रकार थांबविण्याची मागणी

Amit Kulkarni

पंतप्रधान पीक विमा योजनेच्या जनजागृतीला सुरुवात

Amit Kulkarni

बसवण कुडचीत, मच्छे येथे आंबिल गाडय़ांची मिरवणूक

Amit Kulkarni

रविवार पेठ पुन्हा बंद ठेवण्याची सूचना

Patil_p