ओडिशातील नागेशु पात्रो यांच्या निर्धाराला सलाम
ओडिशाच्या गंजाम जिल्हय़ातील 31 वर्षीय नागेशु पात्रो हे दिवसा एका खासगी महाविद्यालयात अतिथी व्याख्याते म्हणून काम करतात, परंतु रात्रीच्या वेळी बेरहामपूर रेल्वेस्थानकावर कुलीचे काम करताना दिसून येतात. पात्रो हे काम स्वतःचा खिसा भरण्यासाठी नव्हे तर गरीब मुलांना शिक्षण मिळवून देण्यासाठी करतात. पात्रो यांनी एक कोचिंग सेंटर सुरू केले असून यात गरीब मुलांना मोफत शिक्षण पुरविले जाते. या कोचिंग सेंटरमधील शिक्षकांचे पगार देण्याकरता पात्रो हे रात्री कुलीचे काम करतात.
दिवस सुरू होताच पात्रो अतिथी शिक्षकाच्या स्वरुपात खासगी महाविद्यालयात पोहोचतात. त्यानंतर गरीब मुलांसाठी सुरू करण्यात आलेल्या कोचिंग सेंटरमध्ये मोफत वर्ग घेण्यासाठी जातात. रात्रीच्या वेळी ते बेरहामपूर रेल्वेस्थानकावर कुलीचे काम करतात. कोरोना महामारीदरम्यान घरी रिकामी बसण्याऐवजी गरीब मुलांना मोफत शिकविण्यास प्रारंभ केला होता. विद्यार्थ्यांची संख्या वाढल्यावर त्यांनी आठवी ते 12 वीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी एक कोचिंग सेंटर सुरू केले. पात्रो हे स्वतः हिंदी आणि ओडिशा भाषा शिकवितात. तर उर्वरित विषयांसाठी त्यांनी अन्य शिक्षक नेमले आहेत. या शिक्षकांना ते 10 हजार ते 12 हजार रुपयांपर्यंतचा पगार देत आहेत. याकरता ते रेल्वेस्थानकावर कुली म्हणून काम करत आहेत. मला शिकविणे आवडते आणि गरीब मुलांसाठी हे कोचिंग सेंटर मी सुरू ठेवू इच्छितो असे पात्रो यांनी म्हटले आहे.
पात्रो हे 2011 पासून रेल्वेस्थानकावर कुलीच्या स्वरुपात नोंदणीकृत आहेत. त्यांनी बेरहामपूर विद्यापीठातून पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण प्राप्त केले आहे. स्वतःचे पूर्ण उच्च शिक्षण त्यांनी रात्रीच्यावेळी कुलीचे काम करून जमविलेल्या पैशातून केले आहे. सध्या लोक ट्रॉली बॅग आणि एस्केलेटरचा वापर करत आहेत, यामुळे कुलीच्या स्वरुपात कमाई कमी झाली आहे. रेल्वेस्थानकावर कठोर मेहनत करणाऱया कुली समुदायासाठी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी पावले उचलावीत असे आवाहन पात्रो यांनी केले आहे.