Tarun Bharat

राज्यहितासाठी सरकारला सहकार्य करा

मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचे विरोधकांना आवाहन : ’100 दिनपूर्ती’ कार्यक्रमात दिली कार्याची माहिती

प्रतिनिधी /पणजी

सत्ताधारी आणि विरोधी आमदारांनी हातात हात घालून एकमेकांच्या सहकार्याने काम केल्यास राज्याच्या विकासात मोलाचे योगदान लाभेल, असा विश्वास मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी व्यक्त केला.

राज्यातील भाजप सरकारच्या ’हंड्रेड डेज ऑफ एक्शन’ अर्थात 100 दिनपूर्तीनिमित्त आयोजित राज्यस्तरीय कार्यक्रमात ते बोलत होते. सावंत यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारने फेब्रुवारी 2022 च्या विधानसभा निवडणुकीत दुसऱयांदा बहुमत प्राप्त करत पुन्हा सरकार स्थापन केले. त्याला 6 जून रोजी 100 दिवस पूर्ण झाले. त्या काळातील विविध कार्य आणि कामगिरीची माहिती मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली.

सभापती रमेश तवडकर, कृषीमंत्री रवी नाईक, जलस्रोतमंत्री सुभाष शिरोडकर, वाहतूकमंत्री माविन गुदिन्हो, साबांखामंत्री नीलेश काब्राल, वीजमंत्री सुदिन ढवळीकर, क्रीडामंत्री गोविंद गावडे, मच्छिमार खात्याचे मंत्री नीळकंठ हळर्णकर, पर्यटनमंत्री रोहन खंवटे, समाज कल्याणमंत्री सुभाष फळदेसाई, यांच्यासह सत्ताधारी आणि काही विरोधी आमदार, भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद तानावडे, उद्योजक श्रीनिवास धेंपे, अन्य उद्योजक, मुख्य सचिव पुनित कुमार गोयल, दोन्ही जिल्हाधिकारी तसेच अन्य सचिव व खातेप्रमुख आदी मान्यवर उपस्थित होते.

धडाकेबाज, कठोर निर्णय

या 100 दिवसांच्या काळात आपल्या सरकारने अनेक धडाकेबाज निर्णय घेतले.  सक्तीने धर्मांतरण करणाऱयावर कठोर कारवाई करण्यात आली. जमीन बळकाव प्रकरणाच्या तपासासाठी एसआयटी स्थापन करण्यात आली. रस्त्यांच्या दुरवस्थेसाठी कंत्राटदाराबरोबरच संबंधित अभियंते आणि कर्मचाऱयांना जबाबदार धरून कारवाई करण्यात आली, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

खाणी ताब्यात घेण्याची प्रक्रिया

खाण क्षेत्राविषयी बोलताना, आजपर्यंत खाजगी कंपन्यांच्या त्याब्यात असलेल्या राज्यातील 88 खाण लीज ताब्यात घेण्याच्या दृष्टीने प्रक्रिया सुरू करून सरकारने एक सक्रिय पाऊल उचलले असून खाण लीजांच्या ई-लिलावाची प्रक्रिया देखील मार्गी लावली आहे, अशी माहिती मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी दिली.

नवीन औद्योगिक वाढ धोरण

औद्योगिक क्षेत्राचा विचार करता, व्यवसाय करणे सुलभ आणि बळकट व्हावे यासाठी नवीन औद्योगिक वाढ आणि गुंतवणूक प्रोत्साहन धोरण 2022 चे अनावरण करण्यात आले आहे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

गोव्याची 16 व्या क्रमांकावर झेप

व्यवसाय सुधारणा कृती आराखडय़ाशी संबंधित विभागाद्वारे राबविण्यात आलेले उपक्रम आणि सुधारणांचा सरकारकडून आढावा घेतला जात आहे. व्यवसाय करणे सुलभ व्हावे यादृष्टीने आमच्या सेवा सुधारण्यावर भर दिला जात आहे. याचाच परिणाम म्हणून गोव्याने 24 वरून 16 व्या क्रमांकावर झेप घेतली आहे, असे उद्योग आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभागाने म्हटले असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.

पर्यटनाच्या बाबतीत बोलताना मुख्यमंत्र्यांनी, पर्यटन व्यवसायाशी संबंधितांना व्यवसाय करणे सुलभ व्हावे यासाठी सर्व प्रकारच्या परवान्यांचे नूतनीकरण करण्यासाठी ऑनलाइन परवाना आणि नोंदणी सेवा सुरू करण्यात आली.

कोरोनानंतरही पर्यटकांत वाढ

पुढे बोलताना मुख्यमंत्र्यांनी, पोर्तुगीज काळात नष्ट करण्यात आलेल्या मंदिरांच्या जीर्णोद्धारासाठी 20 कोटी रुपये दिले असल्याचे सांगितले. कोविड-19 च्या तीन लाटांचा फटका बसल्यानंतरही गोव्यात पर्यटकांच्या आगमनात सातत्याने वाढ झाली आहे. मार्च 2022 ते मे 2022 पर्यंत 1940683 देशी आणि 33841 विदेशी पर्यटकांनी गोव्याला भेट दिली, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.

स्वागत गिताने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. मान्यवरांच्या हस्ते समई प्रज्वलित करण्यात आली. माविन गुदिन्हो यांनी स्वागतपर भाषणात विरोधकांनी वाईटाला जरूर विरोध करावा, चांगल्या कामांना विरोध करू नये, असे आवाहन केले. कार्यक्रमात त्यानंतर सरकारच्या 100 दिवसांच्या कार्याची माहिती देणारा माहितीपट दाखविण्यात आला. तसेच ’आत्मनिर्भर भारत-स्वयंपूर्ण गोवा’, ’सरकारचे 100 दिवस’ आणि ’डबल इंजिन सरकारची 8 वर्षे’ या तीन पुस्तिकांचे प्रकाशन करण्यात आले.

राज्य सरकारच्या गृहआधार सारख्या विविध सामाजिक सुरक्षा योजनांच्या लाभधारकांना आपले मासिक मानधन खात्यात जमा झाले आहे की नाही याची सतत चिंता लागून राहिलेली असते. त्यासाठी अनेकदा ते खात्यात विचारणा करतात, काहीजण खेपाही मारतात. या सर्वावर उपाय म्हणून सरकारने त्यांना एसएमएस पाठवून माहिती देणारी सेवा सुरू केली आहे. त्या सेवेचे मुख्यमंत्र्यांनी उद्घाटन केले. शेवटी साबांखामंत्री काब्राल यांनी आभार प्रदर्शन केले.

शंभर लोकांना सनदांचे वितरण

कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सुमारे 100 नागरिकांना सनद वितरण करण्यात आले. त्यात सत्तरी, सांगे, केपे, काणकोण या भागातील लोकांचा समावेश होता. गत कित्येक वर्षांपासून लोकांनी केवळ सनद मिळण्याची प्रतीक्षाच केली. विद्यमान सरकारने ते प्रत्यक्षात करून दाखविले. गत कार्यकाळात 355 जणांना सनदा वितरित करण्यात आल्या. सुमारे 10 हजार लोकांनी सनद मिळविण्यासाठी दावे केले आहेत. पुढील वर्षभरात किमान 50 टक्के लोकांना सनद देण्याचे आपल्या सरकारचे प्रयत्न असतील, असे मुख्यमंत्री म्हणाले. याकामी दिलेल्या योगदानासाठी महसूलमंत्री बाबूश मोन्सेरात यांची मुख्यमंत्र्यांनी प्रशंसा केली.

मंत्री विश्वजित यांचा खुद्द भाजपच्या कार्यक्रमांवर बहिष्कार?

सावंत सरकारने 100 दिवस पूर्ण केले असले तरी यादरम्यान झालेल्या अनेक महत्वपूर्ण कार्यक्रमांवर मंत्री विश्वजित राणे यांची बहिष्कार टाकला. यासंबंधी अनेकदा मुख्यमंत्री तसेच भाजप प्रदेशाध्यांकडेही विचारण करण्यात आली होती. परंतु प्रत्येकवेळी ’पूर्वनियोजित वेळापत्रकामुळे’ ते कार्यक्रमास उपस्थित राहू शकले नाहीत, अशी कारणे देण्यात येत होती. कालच्या 100 दिनपूर्ती कार्यक्रमातही राणे दिसले नाहीत. त्यामुळे उपस्थितांमधून कुजबूज सुरू असलेली ऐकू येत होती. राणे आणि मुख्यमंत्री यांच्यात वितुष्ट-मतभेद आहेत हे आता ’उघड गुपित’ बनले आहे. त्यामुळेच राणे विविध निमित्ते शोधत कार्यक्रमांवर बहिष्कार टाकत आहेत की काय असा संशयही काहीजण व्यक्त करत होते. विरोधी पक्षातील आमदारही कालच्या कार्यक्रमात उपस्थित राहिले आणि खुद्ध सरकारातील मंत्री मात्र सहभागी झाले नाही, यावरुन भाजपातही काल कार्यक्रमानंतर संताप व्यक्त करण्यात आला.

Related Stories

अर्थकारणाला गती देण्यासाठी देशी उत्पादनांना प्राधान्य द्या !

Omkar B

मुसळधार पावसामुळे पूर सदृश स्थिती

Patil_p

नव्या मोटरवाहन कायद्याची अंमलबजावणी 7 पासून

Omkar B

गोव्याची संपूर्ण मदार आता सर्वोच्च न्यायालयावर

Amit Kulkarni

मांगोरहिलमधील संसर्ग सामूहिक नव्हे, स्थानिक!

Patil_p

कोरोनामुळे जनतेने सरकारला दोष न देता स्वताची काळजी घ्यावी

Patil_p