वार्ताहर /कंग्राळी बुद्रुक
शाहूनगर परिसरातील श्री साई कॉलनी येथील साई मंदिर सेवा समिती कार्यकर्ते व ग्रामस्थांच्यावतीने कोरोनायोद्धा डॉ. सौरभ राजगोळकर यांचा नुकताच सत्कार करण्यात आला. अध्यक्षस्थानी सामाजिक कार्यकर्ते भरत होनगेकर होते.
व्यासपीठावर आमदार लक्ष्मी हेब्बाळकर, उपाध्यक्ष अनिल पावशे, ग्रा. पं. सदस्य जयराम पाटील, तानाजी पाटील, मेनका कोरडे, उमेश पाटील, प्रदीप पाटील उपस्थित होते.
डॉ. सौरभ राजगोळकर यांनी मागील वर्षी कोरोना महामारीच्या काळात आपल्या जीवाची पर्वा न करता अनेक रुग्णांवर उपचार करून त्यांना बरे केले. नुकतीच कोरोनाची लागण झालेल्या अनेक रुग्णांना माफक दरात उपचार करून जीवदान दिले. अशा कोरोनायोद्धा डॉ. सौरभ राजगोळकर यांचा गौरव करणे गरजेचे असल्याचे निवृत्त मुख्याध्यापक दत्तात्रय किल्लेकर यांनी सांगितले. आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या हस्ते कोरोनायोद्धा डॉ. सौरभ राजगोळकर यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. डॉ. राजगोळकर यांनी सत्काराबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
कार्यक्रमाला साई मंदिर सेवा समितीचे कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते. निवृत्त मुख्याध्यापक दत्तात्रय किल्लेकर यांनी प्रास्ताविक, सूत्रसंचालन करून आभार मानले.