अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा : जागतिक लिंगायत महासभेच्यावतीने जिल्हाधिकाऱयांना निवेदन
प्रतिनिधी / बेळगाव
नववीच्या समाज विज्ञान पुस्तकामध्ये महान संत बसवेश्वर यांच्याबद्दल चुकीची माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना चुकीचा इतिहास सांगितला जात आहे. त्यामध्ये तातडीने दुरुस्ती करावी अन्यथा तीव्र आंदोलन करू, असा इशारा जागतिक लिंगायत महासभा व राष्ट्रीय बसव सेनेच्यावतीने देण्यात आला. जिल्हाधिकाऱयांना निवेदन देऊन पुस्तकात तातडीने बदल करावा, अशी मागणी केली आहे.
बसवेश्वरांनी जे कार्य केले आहे ते मोठे आहे. मात्र त्यांचा इतिहास चुकीच्या पद्धतीने पुस्तकाच्या माध्यमातून प्रसिद्ध केला जात आहे. हे समाजाच्यादृष्टीने घातक आहे. तेव्हा पाठय़पुस्तकांमध्ये ज्या चुका झाल्या आहेत त्या गंभीर आहेत. तातडीने त्याची दुरुस्ती करावी, अन्यथा तीव्र आंदोलन करू, असा इशारा देण्यात आला आहे.
महत्त्वाचे म्हणजे, शालेय पाठय़पुस्तकांमध्ये चुकीचा उल्लेख करून विद्यार्थ्यांना चुकीची माहिती देऊ नये, विद्यार्थ्यांची दिशाभूल करण्याचा हा प्रकार आहे. बसवेश्वर हे मुंज करून कुडलसंगमला गेले, असा उल्लेख केला गेला आहे. तो पूर्ण चुकीचा आहे. माझी मुंज करत असाल तर माझ्या बहिणीची मुंज करा. कारण समानता समाजामध्ये निर्माण होऊ दे हा उद्देश ठेवून त्यांनी मुंजला विरोध केला होता. मात्र मुंज करून घेऊन ते कुडलसंगमला गेले, असा उल्लेख केला आहे तो चुकीचा आहे, असे निवेदनात म्हटले आहे.
त्यांनी कधीच जाती-भेद केला नाही. त्यांनी लिंगायत धर्माची स्थापना केली. त्यामध्ये विभाग केला नाही. मात्र पुस्तकात लिंगायत धर्मामध्येच पोटजाती असल्याचा उल्लेख केला आहे तो देखील चुकीचा आहे. तेक्हा पुस्तकामध्ये जो चुकीचा उल्लेख केला आहे तो तातडीने काढावा, असे या निवेदनात म्हटले आहे. याचबरोबर कुवेंपू यांच्याबद्दलही चुकीची माहिती देण्यात आली आहे. तेंव्हा सरकारने याचा गांभीर्याने विचार करावा आणि चुका दुरुस्त कराव्यात, असे या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
यावेळी जागतिक लिंगायत महासभेचे अध्यक्ष ऍड. बसवराज रोट्टी, राष्ट्रीय बसव सेना अध्यक्ष शंकर गुड्स, अरविंद पारुशेट्टी, ए. वाय. भेंडीगेरी, एस. जी. सिद्धनाळ, बी. एस. सुलतानपुरी, सतीश चौगुला, राजू पद्मण्णावर, आनंद करकी, राजू कुंदगोळ, सुजाता मत्तीकट्टी यांच्यासह नागरिक उपस्थित होते.