पत्रकार परिषदेत ग्रा. पं. सदस्यांची माहिती : भ्रष्टाचारात पीडीओ-सेक्रेटरी सामिल असल्याचा आरोप, कारवाई होईपर्यंत पाठपुरावा करण्याचा निर्धार
खानापूर : तालुक्यातील बरगाव ग्राम पंचायतीत भ्रष्टाचाराबाबत लोकायुक्तांकडे तक्रार करून भ्रष्टाचारात सहभागी असलेल्यांवर कठोर कारवाई होईपर्यंत सतत पाठपुरावा करत राहणार, अशी माहिती बरगाव ग्रा. पं. सदस्या पद्मश्री पाटील यांनी येथील शिवस्मारक येथे बोलावलेल्या पत्रकार परिषदेत दिली. यावेळी निवृत्त कॅप्टन संजीव पाटील, डी. बी. पाटील, तुकाराम हणमंत पाटील, प्रताप पाटील हे निवृत्त जवानही उपस्थित होते.
गेल्या वर्षापूर्वी ग्रा. पं. सदस्य म्हणून निवडून आल्यानंतर ग्राम पंचायतीतील अनेक गोष्टी निदर्शनास येत होत्या. पीडीओ, सेक्रेटरी आणि कर्मचारी हे योग्य माहिती देत नव्हते. माझ्याकडे पंचायत कार्यक्षेत्रातील अनेकांनी तक्रारी केल्या होत्या. त्याबद्दल मी कागदपत्रंाची मागणी केली. मात्र कागदपत्रांची पूर्तता करण्यात आली नाही. बरगाव ग्राम पंचायतीमध्ये महसूल जमा करण्यासाठी जी पावती पुस्तके छापली जातात. तीच पावती पुस्तके बनावट छापून घरफाळा, ना हरकत पत्र, बोजा दाखल, नाव दाखल यासह अन्य प्रकारचा महसूल जमा करून बनावट पावत्या देण्यात येत होत्या. याबाबतची अनेक प्रकरणे आपण उघडकीस आणली आहेत. मी वरिष्ठ अधिकाऱयांकडे तक्रार केल्यानंतर 12 जानेवारीनंतर 22 बनावट पावती पुस्तकांवर जमवलेली रक्कम पंचायतीला जमा करण्यात आली. त्यावेळी पंचायतीच्या अधिकृत पावती पुस्तक पावत्या फाडण्यात आल्या. मात्र त्या पावत्या ज्यांनी फाळा भरला आहे. त्यांच्यापर्यंत पोहोचल्याच नाहीत. या बाबतचा नमुना म्हणून पुंडलिक यादू पाटील यांची 7100 रुपये पावती 26-02-2021 रोजी देण्यात आली होती. मात्र पंचायतीला जमाच करण्यात आली नव्हती. आपण याबाबत तक्रार केल्यानंतर 16-02-2022 रोजी पंचायतीच्या अधिकृत पावती पुस्तकातून पावती देवून जमा करण्यात आली आहे.
ना हरकतवर सेक्रेटरींची खोटी सही
अशा अनेकांचा घरफाळा, ना हरकत पत्र, नळजोडणी यासह अन्य महसूलाच्या पावत्या पंचायतीच्या अधिकृत पावती पुस्तकातून 26-02-2022 नंतर देण्यात आल्याचे माझ्या निदर्शनास आले आहे. तसेच गावडू विठोबा पाटील व मलकर्णी गोरे यांना हेस्कॉमसाठी लागणारे ना हरकत पत्र सेक्रेटरींची खोटी सही करून देण्यात आले. त्यावेळी बरगाव ग्रा. पं. च्या सेक्रेटरी पदावर कुणाची नेमणूक झाली नव्हती. त्याबाबतची कागदपत्रे माझ्याकडे उपलब्ध आहेत. या सर्व पुराव्यासह मी याबाबत लेखी तक्रार ता.पं. अधिकाऱयांकडे केली होती. मात्र इतके गंभीर प्रकरण असूनदेखील तालुका पंचायत अधिकाऱयांनी याबाबत कोणतीही कारवाई केली नाही. यासाठी मी आता लोकायुक्तांकडे दाद मागणार आहे, असे पद्मश्री पाटील यांनी सांगितले.
लिपिक विरोधात तक्रार
पीडीओ संतोष चौगुले, सेक्रेटरी हणमंत पाटील यांच्याकडे लिपीक रामलिंग पाटील यांच्या विरोधात मी जुलै 21 मध्ये तक्रार केली होती. याबाबत त्यांना वर्तन सुधारण्याचे ताकीद देवून सोडून देण्यात आले होते. मात्र त्यानंतरही रामलिंग पाटील यांनी अशा प्रकारची अनेक प्रकरणे केली आहेत. त्यामुळे या भ्रष्टाचारात पीडीओ संतोष चौगुले, सेक्रेटरी हणमंत पाटील हे सामील आहेत, असा माझा आरोप आहे.
रोजगार हमी योजनेत भ्रष्टाचार करण्यात आला आहे. अनेकांचे जॉबकार्ड वापरुन रोजगार हमी योजनेत न काम केलेल्यांनाही पैसे काढून देण्यात आले आहेत. 12 जानेवारीला तक्रार केल्यानंतर फेब्रुवारी महिन्यात ही जॉबकार्डे पंचायतीमधून हलविण्यात आली आहेत. भ्रष्टाचारात सहभागी असलेल्यांवर कारवाई होईपर्यंत मी पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
पंचायतीमध्ये बिलींग यंत्रणा बसवल्यास भ्रष्टाचाराला आळा बसेल
या सर्व भ्रष्टाचारातून बनावट पावती पुस्तकाद्वारे पंचायतीचा महसूल बुडवला जात आहे. यासाठी पंचायत राज योजनेमधून प्रत्येक पंचायतीला बिलींग मशीन देण्याची योजना आहे. बिलींग मशीन पंचायतमध्ये उपलब्ध असूनदेखील तिचा वापर करण्यात येत नाही. यापुढे पंचायतीमध्ये या बिलींग यंत्राचा वापर करण्यात यावा, त्यामुळे भ्रष्टाचाराला आळा बसेल व शासनाचा महसूल बुडणार नाही. तरी वरिष्ठ अधिकाऱयांनी तात्काळ बिलींग मशिनची सुरुवात करावी.