फुलेरने नोंदवला एकमेव विजयी गोल
वृत्तसंस्था/ अल रय्यान, कतार
पेशेर फुलेरने 81 व्या मिनिटाला नोंदवलेला एकमेव गोल निर्णायक ठरल्याने येथे झालेल्या विश्वचषक स्पर्धेतील गट ई मधील सामन्यात कोस्टारिकाने जपानला चकित केले. या पराभवामुळे जपानच्या शेवटच्या सोळामध्ये पोहोचण्याच्या आशेला धक्का बसला आहे.
कोस्टारिकाच्या या विजयामुळे गट खुला झाला असून जर्मनीलाही एकप्रकारे जीवदान मिळाले आहे. जर्मनीला पहिल्या सामन्यात जपानकडून 1-2 असा धक्कदायक पराभव स्वीकारावा लागला होता. जपानने जर्मनीवर ऐतिहासिक विजय मिळविल्यानंतर स्पेनने कोस्टारिकाचा 7-0 असा धुव्वा उडविल्यामुळे जपानचा शेवटच्या सोळांमध्ये पोहोचण्याचा मार्ग सुकर झाला होता. कोस्टरिका व जपान यांचे प्रत्येकी 3 गुण झाले असून कोस्टारिकालाही बाद फेरी गाठण्याची संधी मिळाली आहे.
कोस्टारिका-जपान सामना फारसा ऍक्शनपॅक्ड असा झाला नाही. 81 व्या मिनिटाला फुलेरने टार्गेटवर मारलेला एकमेव फटका ठरला. या गोलनंतर ड्रम वाजविणारे जपानचे चाहते एकदम सुन्न झाले होते. येथील सामन्यात लाईनअपमध्ये बदल केल्यानंतर त्यांना विशेष चमक दाखविता न आल्यामुळे चौथ्यांदा या स्पर्धेची बाद फेरी गाठण्याची त्यांची आशा अधांतरी झाली आहे. त्यांचा शेवटचा सामना स्पेनविरुद्ध होणार आहे.
या सामन्यात जपानने सुरुवातीच्या दोन मिनिटात जोरदार खेळ केला. पण त्यानंतर पूर्वार्धात फारशी ऍक्शन पहावयास मिळाली नाही. कोस्टारिकाच्या गोलपोस्टच्या जवळ फारसा गोंधळ झाला नाही, त्यामुळे त्यांना हायसे वाटले असावे. कारण स्पेनविरुद्ध त्यांनी पूर्वार्धात तीन गोल करण्याची संधी दिली होती. याशिवाय दोन्ही गोलरक्षकांनाही फारसे काम लागले नाही. एकदा जपानच्या रित्सू डोअनने गोलजवळून क्रॉस फटका मारला होता. त्यावर कोस्टरिकाच्या जोएल कँपबेलने स्कूप केलेला चेंडू बारवरून बाहेर गेला. उत्तरार्धात बराच वेळ कोस्टारिकाच्या हाफमध्येच खेळ चालू होता. जपानच्या खेळाडूंनी दडपण आणले असते तर त्यांना गोल मिळालाही असता. पण त्यांच्याकडून तसे प्रयत्न झाले नाहीत. जपानला चेंडू क्लीअर करता न आल्याने 81 व्या मिनिटाला फुलेरने कर्लिंग फटक्यावर गोलरक्षक शुइची गोन्डाला चकवा देत विजयी गोल नोंदवला.
आजचे सामने
1) कॅमेरून वि. सर्बिया
वेळ ः दुपारी 3.30 वा.
2) द.कोरिया वि. घाना
वेळ ः सायं. 6.30 वा.
3) ब्राझील वि. स्वित्झर्लंड
वेळ ः रात्री 9.30 वा.
4) पोर्तुगाल वि. उरुग्वे
वेळ ः मध्यरात्री 12.30 वा.