नऊ दिवसांपासून कोणताही पुरावा नाही : रविवारी कोम्बिंग शोधमोहिमेद्वारे रेसकोर्स परिसर पिंजून काढला
प्रतिनिधी /बेळगाव
मागील महिनाभरापासून दहशत माजविलेल्या बिबटय़ाचा शोध अद्याप लागला नाही. तसेच नऊ दिवसांत बिबटय़ाबाबत एखादा पुरावाही समोर आला नाही. किंवा बिबटय़ा कॅमेऱयातही कैद झाला नाही. त्यामुळे बिबटय़ा रेसकोर्स परिसर सोडून निघून गेला आहे, असे वनखात्याने स्पष्ट केले आहे.
रविवारी सकाळी रेसकोर्स परिसरात कोम्बिंग ऑपरेशन मोहीम राबवून पुन्हा शोधमोहीम हाती घेतली होती. 27 ट्रप कॅमेरे, सीसीटीव्ही कॅमेरे यामध्ये बिबटय़ा कोठेच आढळला नाही. शिवाय दोनशे वनकर्मचारी व शंभर पोलिसांनी पुन्हा एकदा रेसकोर्सचा परिसर पिंजून काढला. मात्र, काहीच हाती लागले नाही.
त्यामुळे बिबटय़ा आता आपल्या मूळ नैसर्गिक अधिवासात परतला असावा, असा निर्वाळा डीएफओ अँथोनी मरियप्पा यांनी दिला आहे. दरम्यान, रविवारी दुपारी बाकनूर येथील एका शेतकऱयाच्या बैलावर बिबटय़ाने हल्ला केला. त्यामुळे रेसकोर्स परिसरातीलच बिबटय़ा बाकनूरकडे वळला असेल का, याचाही शोध घ्यावा लागणार आहे.
दररोज 70 ते 80 कर्मचाऱयांच्या माध्यमातून सुरू असलेल्या शोधमोहिमेतदेखील बिबटय़ा नजरेला पडला नाही किंवा त्याच्या पाऊलखुणा देखील आढळल्या नाहीत. त्यामुळे बिबटय़ा रेसकोर्स परिसरातून दुसरीकडे गेला असावा, असा अंदाज व्यक्त होत आहे.
5 ऑगस्ट रोजी जाधवनगर परिसरात एकावर बिबटय़ाने हल्ला केला होता. तेव्हापासून वनखात्याने शोधमोहीम हाती घेतली होती. दरम्यान, सर्व यंत्रणा बिबटय़ाच्या मागावर होती. आधुनिक तंत्र, मुधोळ श्वान, प्रशिक्षित हत्ती व शेकडो कर्मचाऱयांच्या माध्यमातून परिसर पिंजून काढला. मात्र, बिबटय़ा हाती न लागताच निघून गेला. नियोजनाअभावी वनखात्याच्या हातातून बिबटय़ा निसटला होता. त्यानंतर शहरात संतप्त प्रतिक्रिया उमटल्या होत्या. त्यानंतर बिबटय़ा नजरेलाही पडला नाही.
आता ग्रामीण भागातील मंडोळी, सावगाव, बिजगर्णी, बेळवट्टी, इनाम बडस, बाकनूर या भागात बिबटय़ा नजरेला पडत आहे. त्यामुळे रेसकोर्स परिसरातील बिबटय़ा बेळवट्टी भागाकडे वावरत आहे का? याबाबतही संभ्रम निर्माण झाला आहे. रेसकोर्स परिसरातील बिबटय़ा सापडला नाही तर दुसरीकडे बेळवट्टी, बाकनूर भागात बिबटय़ाने दहशत माजविल्याने वनखात्याची डोकेदुखी वाढली आहे. वन्यप्राणी हे एकाच ठिकाणी अधिक काळ थांबत नाहीत. त्यामुळे बिबटय़ाही आपल्या मूळ नैसर्गिक अधिवासात निघून गेला असावा, असा अंदाज व्यक्त होत आहे.
मंडोळी भागात देखील ट्रप कॅमेरे
रविवारी वनखात्याचे 200 तर पोलीस खात्याच्या 100 कर्मचाऱयांच्या माध्यमातून कोम्बिंग ऑपरेशन राबविण्यात आले. मागील नऊ दिवसांत बिबटय़ाबाबतचा एकही पुरावा हाती लागला नाही. शिवाय ट्रप कॅमेऱयातदेखील तो आढळून आला नाही. रविवारी पुन्हा रेसकोर्स परिसर पिंजून काढला आहे. शिवाय मंडोळी भागात आढळलेल्या बिबटय़ासाठीदेखील ट्रप कॅमेरे लावण्यात आले आहेत. बिबटय़ा नैसर्गिक अधिवासात निघून गेला असावा.
– अँथोनी मरियप्पा, डीएफओ, वनखाते