दोन विधानसभांच्या निकालाकडे देशाचे लक्ष
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
गुजरात आणि हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीची मतमोजणी गुरुवार, 8 डिसेंबर रोजी होणार आहे. सकाळी 8 वाजता मतमोजणीला प्रारंभ झाल्यानंतर दुपारी 12 वाजेपर्यंत निवडणुकांचा कल स्पष्ट होईल. मात्र, प्रत्यक्ष मतमोजणी पूर्ण होऊन सर्व निकाल जाहीर होण्यास सायंकाळपर्यंत प्रतिक्षा करावी लागणार आहे. दोन्ही राज्ये राजकीयदृष्टय़ा महत्त्वाची असल्याने संपूर्ण देशाचे लक्ष या निकालाकडे लागलेले आहे.
गुजरात विधानसभा निवडणुकीचा दुसरा टप्पा पार पडल्यानंतर काही संस्था आणि प्रसारमाध्यमांनी सोमवारी सायंकाळी मतदानोत्तर अंदाज (एक्झिट पोल) जाहीर केले होते. या अंदाजांनुसार गुजरातमध्ये पुन्हा एकदा भाजपचे ‘कमळ’ फुलणार असून हिमाचल प्रदेशमध्ये भाजप आणि काँग्रेस या दोन राष्ट्रीय पक्षांमध्ये सत्तास्थापनेसाठी रस्सीखेच होण्याचे संकेत मिळाले आहेत. तसेच आम आदमी पक्षाच्या एन्ट्रीमुळे गुजरातमधील रणांगण सर्वाधिक चर्चेत असून तेथे अरविंद केजरीवालांचा पक्ष किती जागा मिळवतो याचीही सर्वांना उत्सुकता आहे. एक्झिट पोलमधील अंदाज कसेही असले तरी देशवासियांना आता प्रत्यक्ष निकालाची प्रतिक्षा आहे.
गुजरातमध्ये पहिल्या टप्प्यासाठी 1 डिसेंबर रोजी मतदान झाले होते तर दुसऱया टप्प्याचे मतदान सोमवारी पार पडले. हिमाचलमध्येही नोव्हेंबरमध्येच मतदान पार पडले असले तरी मतमोजणी गुरुवार, 8 डिसेंबरला होणार आहे. गुजरातमध्ये गेल्या 27 वर्षांपासून भारतीय जनता पक्षाची सत्ता आहे. राज्यात साधारणपणे भाजप आणि काँग्रेसमध्येच मुख्य लढत असते, मात्र यावेळी आम आदमी पक्षाने राज्यातील निवडणूक तिरंगी केली आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून आम आदमी पक्षाचे संयोजक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी राज्यात आक्रमक प्रचार केला होता. येथे 2017 मध्ये भारतीय जनता पक्षाने 99 जागा जिंकल्या होत्या. तर काँग्रेसला 77 जागा मिळाल्या होत्या.
हिमाचल प्रदेशमध्ये भाजप आणि काँग्रेस यांच्यात तुल्यबळ लढत होण्याचे संकेत मिळाले आहेत. येथे सध्या भाजपचे सरकार आहे. राज्यात दर पाच वर्षांनी सरकार बदलण्याची परंपरा आहे. तथापि, सत्ताधारी भाजप पक्ष ही परंपरा खंडित करून सत्तास्थान टिकवण्याचा प्रयत्न करणार आहे. हिमाचल विधानसभेच्या गेल्या निवडणुकीत भाजपने 68 पैकी 44 जागा जिंकून बहुमताने सरकार स्थापन केले. काँग्रेसला 21 जागा मिळाल्या होत्या.