आझमगड, रामपूर, संगरूरमध्ये ‘काँटे की टक्कर’
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
नुकत्याच पार पडलेल्या उत्तरप्रदेशमधील आझमगड आणि रामपूर लोकसभा पोटनिवडणुकीत कोण बाजी मारणार याचा निकाल आज रविवारी समोर येणार आहे. 40 ते 45 टक्के इतक्या कमी मतदानामुळे येथे ‘काँटे की टक्कर’ होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. रामपूरमध्ये सपाच्या बालेकिल्ल्यात भाजप मुसंडी मारण्याच्या तयारीत आहे. उत्तर प्रदेशमधील आझमगड आणि रामपूरमध्ये गुरुवारी लोकसभा पोटनिवडणुकीसाठी मतदान झाले. तर पंजाबमधील संगरूर लोकसभा मतदारसंघात 40 टक्केच मतदानाची नोंद झाली होती. तसेच दिल्लीतील राजेंद्रनगरमध्ये झालेल्या विधानसभा पोटनिवडणुकीत पाच वाजेपर्यंत 44 टक्के मतदान झाले होते. एकंदर सर्व ठिकाणी जवळपास 40 ते 45 टक्क्यांपर्यंतच मतदान झाले होते.
सपा अध्यक्ष अखिलेश यादव यांनी आझमगड आणि आझम खान यांनी रामपूरमधून राजीनामा दिल्यानंतर या दोन्ही जागा रिक्त झाल्या आहेत. आझमगडमधील लढत तिरंगी आहे. येथे सपाने धर्मेंद्र यादव यांना उमेदवारी दिली आहे, तर भाजपने भोजपुरी स्टार दिनेशलाल यादव निरहुआ यांना उमेदवारी दिली आहे. बसपने शाह आलम उर्फ गुड्डू जमाली यांना उमेदवारी दिली आहे. रामपूरमध्ये सपा आणि भाजपमध्ये लढत आहे. आझम खान यांचे निकटवर्तीय असीम राजा यांच्यावर सपाने विश्वास दाखवला असला तरी भाजपकडून रिंगणात असलेले घनश्याम लोधी त्यांना कडवी टक्कर देत आहेत. 2022 च्या विधानसभा निवडणुकीच्या दोन महिन्यांपूर्वीच त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. रामपूरमध्ये बसपा निवडणूक लढवत नसल्यामुळे येथे दुरंगी लढत होत आहे.
पंजाबमधील संगरूर मतदारसंघात आम आदमी पार्टी (आप), काँग्रेस, अकाली दल, भाजप आणि एसएडी (अमृतसर) यांच्यात लढत आहे. पंजाबचे विद्यमान मुख्यमंत्री भगवंतसिंग मान यांनी 2014 आणि 2019 च्या लोकसभा निवडणुका येथून जिंकल्या. 2019 मध्ये जिंकणारे ते देशभरातील ‘आप’चे एकमेव खासदार होते. पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनीही येथे प्रचार केला आहे. येथील सरपंच गुरमेलसिंग घरांचो यांना आपने तिकीट दिले आहे.