व्यक्तीविरोध देशविरोधात बदलू नये ः पंतप्रधान नरेंद्र मोदींचे प्रतिपादन
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
समाजवादी पक्षाचे संस्थापक आणि उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री मुलायम सिंह यादव यांचे निकटवर्तीय राहिलेले हरमोहन सिंह यादव यांच्या 10 व्या स्मृतीदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सोमवारी व्हर्च्युअली संबोधित केले. यावेळी मोदींनी हरमोहन सिंह यांच्या समाजाबद्दलच्या समर्पणाचा उल्लेख केला आहे. यादव यांनी ग्रामपंचायतपासून स्वतःचा राजकीय प्रवास सुरू केला, त्यानंतर ते राज्यसभा खासदार, विधानपरिषद सदस्य, लोकसभा खासदार झाले, राजकारणात मोठी पदे भूषवितानाही त्यांची प्राथमिकता समाजच राहिल्याचे उद्गार मोदींनी काढले आहेत. व्यक्तीपेक्षा पक्ष आणि पक्षापेक्षा देश मोठा आहे. व्यक्तीला विरोध करताना तो देशविरोधात रुपांतरित होऊ नये, असे मोदींनी यावेळी म्हटले आहे.
1971 मध्ये भारत-पाकिस्तान युद्ध झाले तेव्हा प्रत्येक पक्ष सरकारसोबत ठामपणे उभा होता. पहिली अणुचाचणी झाली तेव्हाही असेच घडले, परंतु आणीबाणी लागू झाली आणि लोकशाही चिरडण्याचा प्रयत्न झाल्यावर सर्व पक्षांनी एकत्र येत राज्यघटना वाचविण्यासाठी लढा दिला. हरमोहन सिंह हे त्याच्या संघर्षातील लढाऊ सैनिक होते. आम्ही देश आणि समाजाचे हित विचारसरणींपेक्षा मोठे मानत आलो आहोत, असे मोदींनी म्हटले आहे.
मोदींनी यावेळी थेट उल्लेख न करता विरोधी पक्षांवर निशाणा साधला आहे. सद्यकाळात विचारसरणी आणि राजकीय स्वार्थाला समाज तसेच देशापेक्षा महत्त्वाचे मानण्याचा प्रकार काही जणांकडून सुरू आहे. अनेकदा सरकारच्या कामकाजात विरोधी पक्ष अडथळे आणत आहेत. स्वतः सत्तेवर असताना निर्णय लागू करता न आल्याने आणि आता त्यांची अंमलबजावणी होत असल्याचे पाहून हे लोक त्रस्त होत आहेत. देशाच्या लोकांना हा प्रकार आवडणारा नाही. व्यक्तीचा विरोध देशाच्या विरोधात बदलू नये. विचारसरणीचे स्वतःचे स्थान असले तरीही देश सर्वप्रथम आहे. समाज सर्वप्रथम असल्याचे मोदींनी नमूद केले आहे.
कोण होते हरमोहन सिंह?
चौधरी हरमोहन सिंह यादव हे समाजवादी पक्षाचे संस्थापक सदस्य होते. तीनवेळा आमदार राहिलेल्या हरमोहन यांना सपने दोनवेळा राज्यसभेवर पाठविले होते. मुलायम सिंह यादव पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले तेव्हा हरमोहन यांना ‘मिनी सीएम’ असे संबोधिले जात होते. 1984 च्या दंगलींमध्ये शीख कुटुंबांना वाचविण्यासाठी त्यांना ‘शौर्य चक्र’ने गौरविण्यात आले होते. तसेच ते अखिल भारतीय यादव महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष राहिले.
भाजपकडून प्रयत्न
हरमोहन सिंह यादव यांचे गुणगान गात भाजप समाजवादी पक्षाची हक्काची मतपेढी मानल्या जाणाऱया यादव समुदायाला आकर्षित करण्याचा प्रयत्न करत असल्याचे मानले जात आहे. सोमवारच्या कार्यक्रमात उत्तरप्रदेश, बिहार, उत्तराखंड, पंजाब, राजस्थान, तेलंगणा, गुजरात समवेत 12 राज्यांमधून यादव महासभेचे प्रतिनिधी सामील झाले. या कार्यक्रमात मुलायम सिंह यादव कुटुंबातील कुणीच सामील झाला नव्हता. तर भाजपचे दिग्गज नेते या कार्यक्रमाच्या व्यासपीठावर उपस्थित होते.