बेळगाव : शेतकऱ्यांच्या जमिनीतील विद्युतपंप, केबल वायर चोरणाऱ्या जोडगोळीला कटकोळ पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याजवळून 1 लाख 80 हजार रुपये किमतीचा चोरीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. जिल्हा पोलीस प्रमुख डॉ. संजीव पाटील यांनी एका पत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे. प्रवीण इरय्या पुजारी, गंगाप्पा नागाप्पा यरगट्टी (दोघेही रा. खाणपेठ, ता. रामदुर्ग) अशी त्यांची नावे आहेत. रामदुर्गचे पोलीस निरीक्षक आय. आर. पट्टणशेट्टी, कटकोळचे पोलीस उपनिरीक्षक एस. पी. उन्नद व त्यांच्या सहकाऱ्यांनी ही कारवाई केली आहे.
15 जानेवारी रोजी चिंचनूर (ता. रामदुर्ग) येथील गिऱ्याप्पा पत्र्याप्पा हंजी यांच्या शेतातून 5 स्टार्टर, 200 फूट केबल वायर चोरल्यासंबंधी एफआयआर दाखल करण्यात आला होता. या प्रकरणाचा छडा लावून पोलिसांनी 1 मोटारसायकल, दोन स्टार्टर, केबल वायर, दोन बोरची मोटर व सहा पंप असा 1 लाख 80 हजार रुपये किमतीचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.