ऑनलाईन टीम / तरुण भारत :
पत्राचाळ घोटाळाप्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेले शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या कोठडीत न्यायालयाने 4 ऑक्टोबरपर्यंत वाढ केली आहे. यापूर्वी 8 ऑगस्ट आणि 19 सप्टेंबरला त्यांची कोठडी वाढवण्यात आली होती.
पत्राचाळ घोटाळा प्रकरणात 1 ऑगस्ट रोजी ईडीने राऊत यांना अटक केली होती. ते सध्या ऑर्थर रोड कारागृहात आहेत. या प्रकरणात दाखल करण्यात आलेल्या आरोपपत्राची आज न्यायालयाने दखल घेतली. परंतु आम्हाला अद्याप आरोपपत्राची प्रत मिळालेली नाही, असं राऊत यांच्या वकिलाने न्यायालयाला सांगितलं. यानंतर राऊत यांना आरोपपत्राची प्रत देण्याचे आदेश न्यायालयाने ईडीला दिले. न्यायालयाच्या आदेशानंतर आज ही प्रत देऊ असं ईडीने सांगितलं. जोपर्यंत तुम्ही आरोपपत्र देत नाही, तोपर्यंत संजय राऊत यांच्या कोठडीत आणखी 14 दिवसांची वाढ करत असल्याचं न्यायालयाने म्हटलं.
अधिक वाचा : मान्सूनचा परतीचा प्रवास येत्या तीन दिवसांत सुरू होणार
दरम्यान, या प्रकरणात ईडीने राऊत यांच्या पत्नीची चौकशी केली असून, राऊत यांचे निकटवर्तीय प्रवीण राऊत यांना सुद्धा अटक करण्यात आली होती. प्रवीण राऊत यांनी या व्यवहारात मिळालेली काही रक्कम संजय राऊत यांच्या पत्नीच्या बॅँक खात्यात वर्ग केली. तसेच त्यातून राऊत यांनी अलिबागमध्ये जमीन खरेदी केल्याचा आरोप ईडीने केला आहे. दरम्यान, या प्रकरणात अटकेत असलेल्या राऊतांची न्यायालयीन कोठडी संपत होती. त्यामुळे त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले होते. न्यायालयाने त्यांच्या न्यायालयीन कोठडीत 4 ऑक्टोबरपर्यंत वाढ केली.
काय होतं हे प्रकरण?
गोरेगाव येथील पत्राचाळीत महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरणाचा भूखंड आहे. ईडीच्या आरोपानुसार, प्रवीण राऊत यांच्या गुरु आशिष कन्स्ट्रक्शन कंपनीला ही चाळ विकसित करण्याचे काम देण्यात आले होते. मात्र, त्यांनी या जागेचा काही भाग खासगी बिल्डरांना विकला. त्यामुळे या चाळीत राहणाऱया लोकांची फसवणूक झाली. प्रवीण राऊत आणि त्यांचे निकटवर्तीय सुजित पाटकर यांच्याशी संबंधित मालमत्तांवर एकूण 7 ठिकाणांवर छापेमारी केली होती. त्यानंतर 2 फेब्रुवारी रोजी प्रवीण राऊत यांना ईडीकडून अटक करण्यात आली होती. प्रवीण राऊत हे संजय राऊतांचे निकटवर्तीय मानले जातात. याप्रकरणाच्या तपासादरम्यान असं आढळून आलं होतं की, प्रवीण राऊत यांच्या पत्नी माधुरी यांच्या बँक खात्यातून संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा यांच्या बँक खात्यात 83 लाख रुपये पाठवण्यात आले होते. ज्याचा वापर राऊत कुटुंबाने दादरमध्ये फ्लॅट घेण्यासाठी केला होता. याप्रकरणी वर्षा आणि माधुरी राऊत यांचेही नोंदवण्यात आले होते.