अहवाल एक महिन्याच्या आत सादर करण्याचे फर्मान
प्रतिनिधी / दापोली
सध्या राज्यात अत्यंत वादग्रस्त ठरलेल्या व राजकीयदृष्टय़ा महत्त्वपूर्ण अशा तालुक्यातील मुरुड येथील साई रिसॉर्ट प्रकरणी येथील न्यायालयाने पोलिसांना तपासाचे आदेश दिले आहेत. पोलिसांनी तपास करून त्याचा अहवाल एक महिन्याच्या आत येथील न्यायालयाला सादर करायचा आहे.
मुरुड येथे सर्वे नंबर 446 मध्ये साई रिसॉर्ट व सी कोंच रिसॉर्ट बांधण्यात आली आहेत. ही रिसॉर्ट तत्कालीन पालकमंत्री अनिल परब यांनी बेकायदेशीररित्या बांधल्याचा आरोप भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी वेळोवेळी केला आहे.
दापोली न्यायालयामध्ये पर्यावरण विभागामार्फत एक याचिका दाखल करण्यात आली आहे. याची सुनावणी सोमवारी पार पडली. यामध्ये सर्वे नंबर 446 मध्ये सीआरझेडची परवानगी घेण्यात आलेली नाही. यामुळे दोन्ही बांधकामे बेकायदा आहेत. शिवाय दोन्ही बांधकामांनी पर्यावरणाचे कलम 7 चे उल्लंघन केले आहे. तसेच याबाबत पर्यावरण विभागामार्फत आज इशू प्रोसेस नोटीस देण्यात आली. मात्र यातील आरोपी क्रमांक 1 अनिल परब हे दापोली न्यायालयाच्या कार्यक्षेत्राबाहेर राहतात. त्यामुळे सीआरपीसी 202प्रमाणे दापोली पोलीस स्थानकाला याबाबत तपास करण्याचे आदेश येथील न्यायालयाने दिले आहेत. यामध्ये आरोपी क्रमांक 1 अनिल परब, आरोपी क्रमांक 2 साई रिसॉर्ट व आरोपी क्रमांक 3 सी कोंच असे दाखल करण्यात आले आहे.
सदर रिसॉर्ट बांधताना पर्यावरण विभागाचा दाखला घेण्यात आलेला नाही. तसेच सीआरझेड 3चे उल्लंघन करण्यात आले आहे. सदर जागा ही नॉन डेव्हलपमेंट झोनमध्ये येत असल्याने तेथे कोणत्याही प्रकारच्या बांधकामाला परवानगी नाही. शिवाय भरती रेषेपासून 200 मीटरपर्यंत कोणतेही बांधकाम करण्यास सीआरझेड 3मध्ये मनाई करण्यात आलेली असल्यामुळे सदर याचिका दाखल करण्यात आली आहे.
आता दापोली पोलिसांनी याप्रकरणी तपास करून त्याचा अहवाल 30 दिवसांच्या आत दापोली न्यायालयाला सादर करायचा आहे. भारत सरकारच्या वतीने रत्नागिरी येथील सरकारी वकील प्रसाद कुवेसकर यांनी काम पाहिले.