पुढच्या हाताळणीला मथुरा न्यायालयाकडून अनुमती
मथुरा / वृत्तसंस्था
उत्तर प्रदेशातील मथुरा येथील कृष्णजन्मभूमीच्या परिसरात असणारा शाही इदगाह हटविला जावा आणि ही सर्व भूमी भगवान श्रीकृष्णाच्या स्वामित्वाची असल्याचे घोषित करण्यात यावे, अशी मागणी करणारा अभियोग सादर करण्यास मथुरा येथील न्यायालयाने अनुमती दिली आहे. त्यामुळे आता या अभियोगावर पुढे याच न्यायालयात सुनावणी होणार आहे. यासंबंधी अनेक याचिका सादर करण्यात आल्या आहेत. त्यापैकी एक न्यायालयाने संमत केली आहे.
या याचिकेनुसार मथुरेत कृष्णजन्मभूमी असून तेथे बेकायदेशीररित्या शाही इदगाहची निर्मिती करण्यात आली आहे. या इदगाहची भूमी केशवदेश मंदिराच्या स्वामित्वातील असून तेथून हा इदगाह हटवावा. तसेच संपूर्ण 13.37 एकर भूमी केशवदेव मंदिरातील मूर्ती श्रीकृष्ण विराजमान यांच्या नावाने करुन द्यावी. तसेच या स्थानी बांधण्यात आलेली मशीदही मंदिराच्या स्वामित्वातील भूमीवर आहे.
सध्या वाराणसीतील काशी विश्वेश्वर परिसरातील ज्ञानवापी मशिदीचे प्रकरणही न्यायप्रविष्ट आहे. या मशीदीचे सर्वेक्षण न्यायालयाच्या आदेशानुसार करण्यात आले असून तो अहवाल न्यायालयाला सादर करण्यात आला आहे. कृष्णजन्मभूमीच्या सर्वेक्षणाची मागणीही मथुरा न्यायालयात करण्यात आली आहे.
कृष्ण जन्मभूमीचाही इतिहास वाराणसीप्रमाणेच आहे. येथेही औरंगजेबाने साधारणतः साडेतीनशे वर्षांपूर्वी त्या पूर्वीचे मंदीर तोडून मशीद बांधण्यात आली होती. शाही इदगाची निर्मिती मात्र नंतरच्या काळात करण्यात आली होती, असा आरोप करण्यात आला आहे. हे प्रकरणही आता चर्चेचा विषय झाले आहे.