29 जून रोजी हजर रहावे लागणार : भाजप नेत्याकडून मानहानीची याचिका
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
दिल्लीच्या एका न्यायालयाने भाजप नेते प्रवीण शंकर कपूर यांच्याकडून दाखल मानहानीच्या याचिकेप्रकरणी दिल्लीच्या मंत्री आणि आप नेत्या आतिशी मार्लेना यांना समन्स बजावला आहे. आतिशी यांना 29 जून रोजी न्यायालयात हजर राहण्यास सांगण्यात आले आहे. न्यायालयाने आतिशी यांनी केलेल्या आरोपांची दखल घेतली आहे. भाजपने आप आमदारांना लाच देण्याचा आणि खरेदी करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आतिशी यांनी केला होता. यानंतर भाजप नेते कपूर यानी आतिशी यांच्याविरोधात मानहानीची याचिका दाखल केली होती.
मानहानीप्रकरणी कपूर यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचेही नाव घेतले होते. अशाप्रकारच्या आरोपांमुळे माझ्या आणि माझ्या पक्षाच्या प्रतिष्ठेला नुकसान पोहोचले असल्याचा दावा कपूर यांनी केला होता. या आरोपांची दखल घेत न्यायालयाने आतिशी यांना 29 जून रोजी हजर राहण्याचा आदेश दिला आहे.
भाजप नेत्याने 30 एप्रिल रोजी मानहानीची तक्रार केली होती. आप नेत्या आतिशी स्वत:चे खोटे दावे सिद्ध करण्यासठी कुठलेही पुरावे सादर करण्यास अपयशी ठरल्या आहेत असे याचिकेत म्हटले गेले होते. याचिकाकर्ते प्रवीण कपूर यांनी केजरीवाल यांच्या एका सोशल मीडिया पोस्टचा दाखला दिला होता. यात या आप सर्वेसर्वा असलेल्या केजरीवालांनी भाजपने 7 आप आमदारांशी संपर्क करत 25 कोटीची ऑफर दिल्याचा दावा केला होता.
भाजपकडून संपर्क : आतिशी
भाजपने एका निकटवर्तीयाच्या माध्यमातून माझ्याशी संपर्क साधला होता. भाजपमध्ये प्रवेशाची ऑफर देत राजकीय कारकीर्द वाचविण्यास सांगण्यात आले होते. भाजपमध्ये सामील न झाल्यास ईडीकडून एका महिन्यात अटक करण्यात येईल अशी धमकी मिळाल्याचा दावा आतिशी यांनी केला होता.
आप नेत्याने मागावी माफी
आतिशी यांनी खोटे आरोप केल्याप्रकरणी टीव्ही तसेच सोशल मीडियाद्वारे जाहीर माफी मागावी अशी मागणी भाजप नेत्याने याचिकेद्वारे केली आहे. आतिशी यांना याप्रकरणी आता न्यायालयीन खटल्याला सामोरे जावे लागणार असल्याने त्यांच्या अडचणी वाढल्या आहेत.