ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
भारतीय बनावटीच्या ‘COVAXIN’ या कोरोना प्रतिबंधक लसीच्या मानवी चाचणीला आज दिल्लीतील एम्स रुग्णालयात सुरुवात सुरुवात झाली. एका 30 वर्षीय स्वयंसेवकाला या स्वदेशी लसीचा पहिला डोस देण्यात आल्याची माहिती एका वृत्तवाहिनीने सूत्रांच्या हवाल्याने दिली आहे.
भारत बायोटेक या फार्मा कंपनीने ‘COVAXIN’ही देशातील पहिली कोरोना प्रतिबंधक लस तयार केली आहे. या मानवी चाचणी करण्यासाठी अनेक स्वयंसेवकांनी तयारी दर्शवली होती. मात्र, डोस देण्याआधी करण्यात आलेल्या स्क्रिनिंग आणि टेस्टमध्ये संबंधित ३० वर्षीय व्यक्ती पात्र ठरली. त्यामुळे या व्यक्तिची निवड करण्यात आली. या व्यक्तीला लस दिल्यानंतर दोन तास निरीक्षणाखाली ठेवून घरी सोडण्यात येणार आहे. त्यानंतर सात दिवस त्याच्यावर लक्ष ठेवण्यात येणार आहे.
पहिल्या टप्प्यात 18 ते 25 वर्ष वयोगटातील 375 स्वयंसेवकांना ‘COVAXIN’चा पहिला डोस देण्यात येणार आहे. या स्वयंसेवकांमध्ये दिल्लीतील एम्समधील 100 जण असणार आहेत. 14 दिवसानंतर त्यांना दुसरा डोस देण्यात येईल.