धोकादायक वस्तू केल्या जाणार निकामी : लवकरच काम पूर्ण
प्रतिनिधी /बेळगाव
बेळगाव विमानतळाचा विस्तार दिवसेंदिवस वाढत असून, सुरक्षेच्या यंत्रणा अधिक कार्यक्षम करण्यासाठी तयारी सुरू आहे. बॉम्ब सदृश वस्तू आढळल्यास ती निकामी करण्यासाठीची यंत्रणा विमानतळावर उभारली जात आहे. लवकरच कुलींग पीटचे काम पूर्ण केले जाणार आहे.
विमानतळ प्राधिकरणाच्या नियमावलीनुसार, प्रवासी संख्येप्रमाणे सुरक्षेच्या यंत्रणा राबविल्या जातात. विमानतळात प्रवेशापूर्वी पोलीस तसेच राखीव सुरक्षा दलाच्या जवानांकडून कसून चौकशी केली जाते. तरी देखील धोकादायक वस्तू अथवा साहित्य विमानतळ परिसरात आल्यास ते निकामी करण्याची जबाबदारी विमानतळ प्रशासनाची असते. बेळगाव विमानतळावर महिन्याला 27 ते 30 हजार प्रवासी प्रवास करत असल्याने सुरक्षा यंत्रणा सक्षम ठेवण्याची जबाबदारी आहे.
कुलींगपीटचे बांधकाम लवकरच पूर्ण
सुरक्षेच्या दृष्टिकोनातून विमानतळावर कुलींगपीट उभारण्याचे काम डिसेंबरपासून सुरू आहे. बॉम्ब सदृश वस्तू आढळल्यास ती कुलींगपीटमध्ये निकामी करण्यात येते. यासाठी कुलींगपीटचे बांधकाम व काँक्रिटीकरण करण्यात येत आहे. हे काम प्रगतीपथावर असून लवकरच ते पूर्ण होईल असा अंदाज व्यक्त होत आहे.