ऑस्ट्रेलियन अष्टपैलू खेळाडू अँड्र्यू सायमंड्स ( Andrew Symonds )यांचे वयाच्या अवघ्या 46 व्या वर्षी एका कार अपघातात निधन झाले.त्याच्या निधनाने क्रिकेट जगताला मोठा धक्का बसला आहे. क्रिकेटविश्वातून त्याला श्रद्धांजली वाहण्यात येत आहे. क्वीन्सलँड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहराच्या पश्चिमेला सुमारे 50 किमी अंतरावर असलेल्या हर्वे रेंजमध्ये शनिवारी रात्री 10:30 च्या सुमारास ही घटना घडली.
हरभजन सिंगने ( Harbhajan Singh )सायमंड्सच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात भारतीय ऑफ स्पिनर हरभजन सिंग आणि ऑस्ट्रेलियन सायमंड्समध्ये भांडण झाले होते. ‘मंकी गेट’ ( ‘Monkey Gate’ )या नावाने ही घटना प्रसिद्ध आहे.
सायमंड्स यांनी आपल्या कारकिर्दीत 26 कसोटी, 198 एकदिवसीय आणि 14 टी-20 सामने खेळले. यामध्ये त्यांनी कसोटीत 1462 धावा, एकदिवसीय सामन्यात 5088 धावा आणि टी-20 मध्ये 337 धावा केल्या. सायमंड्सने आयपीएलमध्ये डेक्कन चार्जर्स आणि मुंबई इंडियन्ससाठी 39 सामन्यात 974 धावा केल्या.