ऑनलाईन टीम / तरुण भारत :
क्रिकेटपटू केदार जाधव याचे वडील महादेव जाधव हे सोमवारी पुण्याच्या कोथरुड परिसरातून बेपत्ता झाले होते. कोथरूड पोलीस ठाण्यात यासंदर्भात तक्रार दाखल झाल्यानंतर पुणे पोलिसांनी सीसीटिव्ही फुटेजच्या आधारे शोधमोहिम राबवली. तब्बल 8 तासांच्या शोधमोहिमेनंतर केदार जाधव यांच्या वडिलांना पोलिसांनी शोधून काढले.
मिळालेल्या माहितीनुसार, केदार जाधव याचे वडील महादेव जाधव हे पुण्यातील कोथरूड भागात वास्तव्यास आहेत. सोमवारी सकाळी 11.30 वाजण्याच्या सुमारास त्यांचे वडील घराबाहेर पडले. त्यांना स्मृतीभ्रंशाचा आजार आहे. त्यामुळे जाधव कुटुंबीय त्यांना घराबाहेर पाठवत नाहीत. मात्र, महादेव जाधव हे फिरण्यासाठी त्यांच्या घराखालील मेन गेटजवळ गेले होते. त्यांनी काही वेळ तिथे चकरा मारल्या. त्यानंतर आऊट गेटने ते बिल्डींगमधून बाहेर पडले. दिवसभरात त्यांच्याशी कोणताही संपर्क न झाल्याने केदारच्या कुटुंबियांनी कोथरूड पोलिसात ते बेपत्ता झाल्याची तक्रार दिली.
त्यानंतर पोलिसांनी शोधमोहिम राबवली. आठ तासानंतर सोमवारी रात्री महादेव जाधव हे पोलिसांना मुंढवा परिसरात आढळून आले. पोलिसांनी त्यांना कोथरुडमधील अलंकार पोलीस ठाण्यात आणून कुटुंबियांच्या हवाली केले. महादेव जाधव हे सुखरुप असल्याचे पोलिसांनी सांगितले.