Tarun Bharat

साताऱयात गुन्हेगारी पुन्हा उफाळू लागली

कराड तालुक्यातील जुळेवाडीत युवकाचा खून, तर जिल्हय़ात तीन ठिकाणी हल्ला करुन खूनाचा प्रयत्न,

प्रतिनिधी/ सातारा

लग्नास नकार दिल्याने  अल्पवयीन मुलीवर चाकूने वार

शहरातील एका भागात राहत असलेल्या अल्पवयीन मुलीने लग्नास नकार दिल्याने  तिच्यावर चाकूने वार करून खून करण्याचा प्रयत्न युवकाने केला आहे. विवेक नरहरी शेट्टी (वय 23, रा. करंजेनाका सातारा) असे त्यांचे नाव आहे. त्याच्याविरूद्ध मुलीने शाहूपुरी पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी त्याला अटक करून न्यायालयात हजर केले असता 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

  पोलिसांनी दिलेली माहिती अशी, अल्पवयीन मुलगी बुधवार दि. 23 रोजी राहत्या घराच्या अपाटमेंटच्या टेरेसवर अभ्यास करत बसली होती. यावेळी विवेक शेट्टी तिथे  आला. माझ्यावर प्रेम आहे का आता सांग, लग्न करणार आहेस की नाही अशी विचारणा केली. याला मुलीने नकार दिल्याने विवेकला राग आला. त्याने मुलीला जवळ ओढत हातातील चाकूने तिच्यावर वार केले. आणि तिथून तो पळून गेला. ही बाब मुलीच्या घरातल्याना कळताच त्यांनी उपचारासाठी रूग्णालयात नेले. उपचारानंतर शाहूपुरी पोलीस ठाण्यात विवेक विरूद्ध मुलीने दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल झाला आहे. त्याला पोलिसांनी अटक करून न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक संजय पतंगे करत आहेत.

पत्नीला न्यायला आलेल्या पतीवर कोयता हल्ला

फलटण ः पत्नीला न्यायला आलेल्या पतीवर कोयत्याने हल्ला करून जखमी केल्याप्रकरणी सासरा व दोन मेव्हुणे अशा तिघांवर फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत विठ्ठल शिवाजी पवार (वय 22, रा. कोळकी, शारदानगर, ता. फलटण) यांनी फिर्याद दिली. त्याचा सासरा तुकाराम जासन्या काळे, मेव्हुणे जिंदाल तुकाराम काळे, अजय तुकाराम काळे (रा. दातेवस्ती, ता. फलटण) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. गुरुवार दि. 24 रोजी सायंकाळी चारच्या सुमारास दातेवस्ती येथे पत्नी कोमल हिला घेऊन जा, असा फोन आल्याने विठ्ठल हा सासरे तुकाराम काळे यांच्या घरासमोर गेला असता सासऱयाने त्याच्यावर कोयत्याने हल्ला केला.

यावेळी एका मेव्हुण्याने दांडक्याने मारहाण केली, तर दुसऱया मेव्हुण्याने पोटावर चाकूने वार केले. यावेळी भांडण सोडवण्यासाठी मध्ये आलेला फिर्यादीचा भाऊ रोहन पवार यालाही संशयितांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. तपास उपनिरीक्षक कदम करत आहेत.

हॉटेलमालकाचा ग्राहकावरच तलवार हल्ला

सातारा, भुईंज ः पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावर विरमाडे गावच्या हद्दीत असलेल्या महाराज या हॉटेलमध्ये जेवण करण्यासाठी महामुलकरवाडी (ता. जावली) येथील मामा-भाचे दि. 27 रोजी रात्री 11.30 वाजण्याच्या सुमारास गेले होते. जेवण झाल्यानंतर बिल देताना जेवण खूप महाग आहे असे म्हणाल्याच्या कारणावरुन हॉटेल मालक अशरफ अस्लम शेख (सध्या रा. विरमाडे, ता. वाई, जि. सातारा मुळ रा. सदरबझार सातारा) याने तलवारीने सपासप भाच्यावर वार करुन जखमी केले. या प्रकरणी भुईंज पोलिसांनी अशरफ यास अटक केली आहे. घटनास्थळी भुईज पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष कांबळे यांनी भेट दिली होती.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, आनेवाडी टोलनाका ते विरमाडे गावच्या  हद्दीपर्यंत अनेक हॉटेल्स नव्याने झालेली आहेत. पूर्वी टोलनाका नव्हता तेव्हा आनेवाडी येथे दोनच हॉटेल्स होती. आता टोलनाक्यामुळे अनेक हॉटेल्स, ढाबे, टपऱया झालेल्या आहेत. ही हॉटेल्स विरमाडे गावच्या हद्दीत पुलापर्यंत आहेत. या हॉटेल्समध्ये सतत काही ना काही घटना घडत असतात. याच हॉटेल्सच्या समोर वाहने कशीही लागलेली असतात. त्यामुळे अपघातही घडत असतात. शनिवारी रात्री 11.30 वाजण्याच्या सुमारास विरमाडे गावच्या हद्दीत असलेल्या महाराज या हॉटेलमध्ये जेवण करण्यासाठी किशोर महादेव तोरडमल (वय 40, रा. महामुलकरवाडी) आणि त्यांचा भाचा कृष्णात हे जेवण करण्यासाठी गेले. त्यांनी हॉटेलमध्ये मस्तपैकी ऑर्डर दिली. मागवलेले जेवण आले. जेवण केल्यानंतर सव्वा बारा वाजण्याच्या सुमारास बिल देण्याच्या वेळेस काऊटंरवर कृष्णात हा हॉटेल मालक अशरफ यास जेवण खुपच महाग आहे असा म्हणाला, त्यावरुन हॉटेलमालक अशरफ हा चिडला. त्याने अगोदर शिवीगाळ करत किशोर आणि कृष्णात या दोघांना हॉटेलबाहेर ढकलून देण्याचा प्रयत्न केला. परंतु दोघांमध्ये शब्दाने शब्द वाढत गेला. झटापट वाढल्याने आलेल्या रागाच्या भरात अशरफने पळत जावून हॉटेलमध्ये ठेवलेली तलवार आणली. त्या तलवारीने कृष्णात याच्या डोक्यावर आणि डाव्या हातावर सपासप वार केले. या झालेल्या अचानक प्रकारामुळे किशोर हा भयभित झाला तर कृष्णात रक्तबंबाळ अवस्थेत भितीने हॉटेलबाहेर पळू लागला. तेथेच हॉटेलबाहेर पडून राहिला. याची माहिती किशोर याने भुईंज पोलिसांना दिली.

पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी रात्री लगेच जखमी असलेल्या कृष्णात याला सातारा येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्याच्यावर उपचार सुरु असून त्याच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. दरम्यान, भुईज पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष कांबळे यांनी घटनास्थळी भेट दिली. त्यांनी तत्काळ संशयित आरोपी अशरफ यास अटक केली आहे. किशोर तोरडमल याने अशरफ याच्यावर कृष्णात याच्या खुनाचा प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला असून याचा तपास भुईज पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक मोरे हे तपास करत आहेत.

धारधार शस्त्राने वार करून युवकाचा खून

कराड ः जुळेवाडी (ता. कराड) येथे मित्राच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमात युवकावर कोयत्याने वार करून त्याचा खून करण्यात आला. शनिवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास जुळेवाडीतील पुजारी चौकात ही घटना घडली. राजवर्धन महादेव पाटील (वय 24, रा. जुळेवाडी) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे.

याप्रकरणी विजय बाबुराव काशिद (रा. जुळेवाडी) याच्याविरोधात कराड तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. रविवारी सायंकाळी तालुका पोलीस ठाण्याच्या गुन्हे शाखेने संशयिताला ताब्यात घेतले. त्याच्यावर अटकेची कारवाई करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.

 पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जुळेवाडी येथील एका युवकाचा शनिवारी वाढदिवस होता. या वाढदिवसानिमित्त रात्री केक कापला जाणार होता. गावातील पुजारी चौकात त्यासाठी युवक जमले होते. राजवर्धन हासुद्धा त्या ठिकाणी गेला. राजवर्धनच्या घरापासून काही अंतरावरच हा चौक आहे. वाढदिवसाचा कार्यक्रम सुरू असताना गावातीलच विजय काशिद या युवकाने अचानक राजवर्धन याच्यावर धारदार कोयत्याने दहा ते पंधरा वार केले. मान, हात, पाय, पाठेवर वर्मी घाव बसल्यामुळे राजवर्धन रक्ताच्या थारोळ्यात कोसळला. अचानक घडलेल्या या घटनेने युवकांची धावपळ उडाली. वार केल्यानंतर राजवर्धनला रक्तबंबाळ स्थितीत सोडून संशयित विजय काशिद तेथून पसार झाला. तर राजवर्धन त्याही परिस्थितीत चालत घरापर्यंत गेला. कुटुंबीय व ग्रामस्थांनी त्याला रुग्णालयात हलवले. मात्र त्याचा मृत्यू झाला.

घटनेची माहिती समजताच अप्पर पोलीस अधीक्षक बापू बांगर यांच्यासह पोलीस निरीक्षक आनंदराव खोबरे यांनी घटनास्थळी भेट दिली. तसेच आरोपीचा शोध घेण्याच्या सूचना पोलीस पथकाला दिल्या. या घटनेने गावात तणावाचे वातावरण झाले. त्यामुळे कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

दरम्यान, रविवारी सायंकाळी संशयित विजय काशिद याला ग्रामीण पोलीस ठाण्याच्या गुन्हे शाखेने ताब्यात घेतले. तर रात्री उशिरापर्यंत त्याला अटक करण्याची कारवाई सुरू होती. अधिक तपास पोलीस निरीक्षक आनंदराव खोबरे  करीत आहेत.

जिल्हा कारागृहात झोपण्याच्या कारणारुन दोन कैद्यात मारामारी

जिल्हा मध्यवर्ती कारागृहात झोपण्याच्या जागेवरून दोन कैद्यांच्यात वाद झाला. या वादात दोन कैद्यांनी दुसऱया कैद्याला फरशीच्या व वीटेने मारहाण केली. या मारहाणीत तो जखमी झाल्याने त्याला जिल्हा शासकीय रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. सागर किसन पार्टे असे त्यांचे नाव आहे.  पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 26 रोजी सव्वा अकरा वाजण्याच्या सुमारास जिल्हा मध्यवर्ती कारागृहातील सर्कल क्रमांक दोन या ठिकाणी अक्षय संभाजी आढाव, अजय संजय आढाव या कैद्यांचा झोपण्याच्या जागेवरून सागर किसन पार्ट या कैद्यांशी शाब्दिक वाद झाला होता. त्याचा राग मनात धरून अक्षय आढाव आणि अजय आढाव यांनी सागर पार्ट यास वीट व फरशीच्या तुकडय़ाने मारहाण केली. ही बाब कारगृहातील पोलिसांच्या लक्षात येताच त्यांनी ही भांडणे सोडवत संभाजी व अजय यांच्याविरूद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस पोलीस उपनिरीक्षक मोटे करत आहेत.

Related Stories

जागतिक बुद्धिबळदिनानिमित्त सांगलीमधून विविध ऑनलाईन बुद्धिबळ स्पर्धांचे आयोजन

Archana Banage

मल्हारपेठमध्ये सापडल्या बनावट शंभराच्या नोटा

Patil_p

साताऱयात पायलट प्रयोग राबविण्याची मागणी

Patil_p

सातारा : कोडोलीतील 98 वर्षाच्या आजोबांनी केली कोरोनावर मात

datta jadhav

पुणे : 5 किलोमीटर पर्यंतचा प्रवास आता अवघ्या 5 रुपयांत

Tousif Mujawar

जिल्हा पोलिस प्रमुखांच्या हस्ते वाईच्या डिबी पथकाचा प्रशस्तीपत्र देऊन गौरव

Patil_p