नववर्षाच्या सुरुवातीलाच चोरट्यांची जोरदार सलामी : पोलिसांसमोर गुन्हेगारांची डोकेदुखी
प्रतिनिधी /बेळगाव
नववर्षाच्या पहिल्याच आठवड्यात गुन्हेगारांनी डोके वर काढले आहे. चोऱ्या, घरफोड्या, चेनस्नॅचिंग पाठोपाठ पूर्ववैमनस्यातून गोळीबाराचीही घटना घडली आहे. गुन्हेगारांनी पोलीस दलासमोर तपासाचे आव्हान उभे केले असून पोलिसांसमोर नव्या वर्षातही जुनीच आव्हाने उभी ठाकली आहेत.
1 जानेवारीपासून चोऱ्या, घरफोड्यांचे प्रकार सुरू झाले आहेत. नववर्षात गुन्हेगार पूर्णपणे सक्रिय झाले असून शहर व उपनगरात चोऱ्या व घरफोड्या करणारे गुन्हेगार कोण? ते स्थानिक आहेत की बाहेरील? याचा उलगडा झाला नाही. विधिमंडळ अधिवेशनाच्या बंदोबस्ताच्या ताणातून बाहेर पडलेल्या पोलीस यंत्रणेसमोर गुन्हेगारांची डोकेदुखी वाढली आहे.
एका बेळगाव ग्रामीण पोलीस स्थानकाच्या कार्यक्षेत्रात आठ दिवसांत तीन घरफोड्या व एका चोरीचा प्रयत्न अशा घटना घडल्या आहेत. 1 जानेवारी रोजी दत्त कॉलनी, नेहरुनगर, मच्छे येथील एका लष्करी जवानाच्या फ्लॅटचा कडीकोयंडा तोडून सुमारे 5 लाखांचा ऐवज चोरट्यांनी पळविला आहे. यासंबंधी नंदिनी सतीश सुतार यांनी फिर्याद दिली आहे.
दुसऱ्या दिवशी पिरनवाडी येथे बाबू होळकर यांच्या बंद घराचा कडीकोयंडा तोडून चोरट्यांनी सुमारे अडीच लाखांचा ऐवज पळविला आहे. या घटनेपाठोपाठ सलग तिसऱ्या दिवशी 3 जानेवारी रोजी शिवमनगर हिंडलगा येथील राजश्री मारुती मरगाळे यांच्या बंद घराचा कडीकोयंडा तोडून लाखाचा ऐवज चोरट्यांनी पळविला आहे. 4 जानेवारी रोजी दत्त कॉलनी, नेहरुनगर मच्छे येथील मनोज तानाजी पाटील यांच्या घराचे कुलूप कापण्याचा प्रयत्न झाला आहे.
4 जानेवारी रोजी शहराच्या मध्यवर्ती भागात मोठी चोरी झाली आहे. आझाद गल्ली येथील हरिष प्रजापत यांच्या फ्लॅटचा कडीकोयंडा तोडून 5 लाखांचा ऐवज लांबविण्यात आला आहे. मार्केट पोलीस स्थानकात या घटनेची नोंद झाली आहे. यापैकी एकाही गुन्ह्याचे धागेदोरे अद्याप हाती आले नाहीत.
चोऱ्या, घरफोड्यांबरोबरच चेनस्नॅचिंगचे प्रकारही सुरू झाले आहेत. एका दिवसात दोन चेनस्नॅचिंग झाल्या आहेत. 4 जानेवारी रोजी दुपारी बॉक्साईट रोड येथील साई मंदिराजवळ सखुबाई कांबळे, रा. टिचर्स कॉलनी यांच्या गळ्यातील सोनसाखळी मोटारसायकलवरून आलेल्या भामट्यांनी पळविली आहे. त्याच दिवशी रात्री 8.30 वाजता चन्नम्मानगर येथे जयश्री नारायण बेळगुंदीकर यांच्या गळ्यातील सोन्याची चेन मोटारसायकलवरून आलेल्या भामट्यांनी पळविली आहे. एपीएमसी व उद्यमबाग पोलीस स्थानकात या दोन्ही घटनांची नोंद झाली आहे.
चोऱ्या, घरफोड्यांच्या घटनांनी वर्षाची सुरुवात झाली. आठवड्याच्या शेवटी शनिवार दि. 7 जानेवारी रोजी श्रीराम सेनेचे जिल्हाध्यक्ष रवी कोकितकर व त्यांच्या वाहनचालकावर गोळीबार झाला. या प्रकरणी पोलिसांनी केवळ 18 तासांत तिघा जणांना अटक केली आहे. गोळीबार प्रकरणाचा वेळेत छडा लावल्यामुळे पुढील अप्रिय घटनांना आळा बसला आहे. या प्रकरणात मात्र पोलिसांचे अभिनंदन केले जात आहे.
मागील पानावरून पुढे
गेल्या वर्षीप्रमाणेच या वर्षाच्या सुरुवातीलाही चोऱ्या, घरफोड्यांचे सत्र मागील पानावरून पुढे सुरू झाले आहे. चोरट्यांनी बंद घरांना लक्ष्य बनविले आहे. घराला कुलूप लावून बाजारात जाऊन येईपर्यंत चोरीचे प्रकार घडू लागले आहेत. त्यामुळे नागरिकांच्या मालमत्तेच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. पोलीस यंत्रणेने अशा घटनांची गांभीर्याने दखल घेऊन बेळगावात सध्या कोणत्या टोळ्या कार्यरत आहेत, त्यांच्या मुसक्या आवळण्याची गरज निर्माण झाली आहे.