Tarun Bharat

क्रोएशियाचा उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश

पेनल्टी शूटआऊमध्ये जपानवर 3-1 गोलफरकाने मात, लिव्हाकोविकचे अप्रतिम गोलरक्षण

वृत्तसंस्था/ कतार

क्रोएशियाने पेनल्टी शूटआऊटमध्ये जपानचा 3-1 अशा गोलफरकाने पराभव करून विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळविला. निर्धारित वेळेत व जादा वेळेतही 1-1 अशी बरोबरी कायम राहिल्यानंतर पेनल्टी शूटआऊटचा अवलंब करण्यात आला. त्यात क्रोएशियाच्या विजयाचा हिरो ठरलेला गोलरक्षक डॉमिनिक लिव्हाकोविकने तीन पेनल्टी वाचवल्या.

निर्धारित वेळेत दायझेन माएदाने 43 व्या मिनिटाला गोल नोंदवून जपानला आघाडीवर नेले. यासाठी त्याला रित्सू डोअनने क्रॉसपास पुरविला होता. साखळी फेरीत जर्मनी व स्पेन या युरोपियन संघांना पराभवाचा धक्का दिल्यानंतर आणखी एका युरोपियन संघाला धक्का देण्याच्या ते मार्गावर होते. त्याआधी पहिल्याच मिनिटाला क्रोएशियाच्या पेरिसिकचा गोल करण्याचा प्रयत्न जपानी गोलरक्षक शुइची गोन्डाने उधळून लावला होता. पण उत्तरार्धात 55 व्या मिनिटाला इव्हान पेरिसिकने देजान लाव्रेनच्या क्रॉसवर हेडर मारत क्रोएशियाला बरोबरी साधून देण्यात यश मिळविले. दोन्ही संघांनी अखेरपर्यंत बरीच धडपड केली. पण गोलबरोबरीची कोंडी त्यांना फोडता आली नाही. त्यामुळे या फेरीत प्रथमच जादा वेळेचा अवलंब करावा लागला. अर्धा तासाच्या जादा वेळेतही दोन्ही संघांना गोल करण्यात यश आले नाही. काही संधी मिळाल्या, पण सदोष नेमबाजी व भक्कम बचाव यामुळे दोघांनाही यश मिळाले नाही. जपानच्या दायची कामादाने प्रतिआक्रमणात टार्गेटच्या दिशेने जोरदार फटका मारला होता. पण गोलरक्षक लिव्हाकोविकने हाताने चेंडू बाहेर घालविल्याने त्याची ही संधी वाया गेली.

सामना जादा वेळेत किंवा पेनल्टी शूटआऊमध्ये गेला की क्रोएशिया त्यात बाजी मारते, हा आजवरचा अनुभव आहे. यावेळीही त्यात बदल झाला नाही. पेनल्टी शूटआऊटमध्ये क्रोएशियाचा गोलरक्षक लिव्हाकोविकने ताकुमी मिनामिनो, काओरु मितोमा, माया योशिदा या जपानच्या तिघांचे पेनल्टी अडवित हॅट्ट्रिक केली आणि तोच क्रोएशियाच्या विजयाचा शिल्पकार ठरला. क्रोएशियाच्या मारिओ पॅसालिकने विजयी पेनल्टी मारत क्रोएशियाला 3-1 असा विजय मिळवून दिला. त्याआधी निकोला व्लासिक, मार्सेलो ब्रोझोविक यांनीही क्रोएशियाचे पेनल्टीमध्ये गोल नोंदवले होते तर मार्को लिवाजाने मारलेली पेनल्टी बारला लागून वाया गेली. जपानचा एकमेव गोल ताकुमा असानोने नोंदवला.

क्रोएशियाने याआधी 2018 वर्ल्ड कपमध्ये उपउपांत्यपूर्व व उपांत्यपूर्व फेरीतही पेनल्टीवरच विजय नोंदवले होते आणि उपांत्य फेरीत जादा वेळेत विजय साकार केला होता. यावेळी जपानवर पेनल्टी शूटआऊमध्ये विजय मिळवित ही परंपरा कायम राखली. क्रोएशियाची उपांत्यपूर्व लढत ब्राझील किंवा दक्षिण कोरिया यापैकी एका संघाविरुद्ध होईल. मागील स्पर्धेत क्रोएशियाने उपविजेतेपद मिळविले होते.

Related Stories

कोरोना लढा : भारतीय ऑलिम्पिक महासंघाचाही पुढाकार

Patil_p

नासेरविरूद्धचा चाचणी चुकविल्याचा आरोप रद्द

Patil_p

38 संभाव्य फुटबॉलपटूंची घोषणा

Patil_p

रमेश पोवारच्या प्रशिक्षकपदाचा कालावधी समाप्त

Amit Kulkarni

एमआय अमिरात संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी शेन बाँड

Patil_p

हैदराबाद हंटर्सचा मुंबईवर विजय, सिंधूची चमक

Patil_p