कृष्णाकाठ भीतीच्या छायेखाली; नागरिकांनी दक्षता घेण्याचे वन विभगाचे आवाहन
वार्ताहर/ कराड
कृष्णा-कोयनेच्या प्रीतिसंगमात पोहायला गेलेल्या वृद्धावर मगरीने हल्ला केल्याची घटना शुक्रवारी सकाळी साडे सहा वाजण्याच्या सुमारास घडली. मधुकर लक्ष्मण थोरात (वय 70, रा. सोमवार पेठ, कराड) असे जखमीचे नाव असून त्यांच्यावर उपजिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात आले. या घटनेमुळे कृष्णाकाठावरील गावांत घबराट पसरली आहे. तर नागरिक व शेतकऱयांनी नदीपात्रात जात असताना सावधानता बाळगण्याचे आवाहन वनक्षेत्रपाल तुषार नवले यांनी केले आहे.
दोन ते तीन महिन्यांपासून टेंभू, खोडशी, प्रीतिसंगम व वहागाव परिसरातील कृष्णा नदीच्या पात्रात वारंवार मगरीचे दर्शन होत आहे. वन विभागाने काही दिवसांपूर्वी खोडशी येथे गावात शिरलेल्या मगरीला पकडून नैसर्गिक अधिवासात सोडले होते. मात्र त्यानंतरही खोडशी येथे मगरीचे दर्शन झाले आहे. तर टेंभू प्रकल्पानजीक वारंवार मगरींचे दर्शन होत असल्याने वन विभागाने येथे मगर प्रवण क्षेत्राचे फलक लावले आहेत. खोडशीपासून टेंभू प्रकल्पापर्यंत कृष्णा नदीच्या पात्रात वारंवार मगरीचे दर्शन होत असल्याने शेतकरी व नागरिकांत भितीचे वातावरण पसरले आहे. त्यातच शुक्रवारी प्रीतिसंगमात पोहणारे मधुकर थोरात यांच्यावर मगरीने हल्ला केल्याने घबराट पसरली आहे.
शहर व परिसरातील अनेक नागरिक पोहण्यासाठी दररोज कृष्णा-कोयनेच्या प्रीतिसंगमात येत असतात. मधुकर थोरातही गेल्या 50 वर्षांपासून येथे पोहण्यासाठी येत आहेत. शुक्रवारी सकाळी सहा वाजता थोरात नेहमीप्रमाणे पोहण्यासाठी प्रीतिसंगमात उतरले. पोहत पोहत ते पलिकडच्या किनाऱयाकडे गेले. साडे सहा वाजण्याच्या सुमारास परत येत असताना नदी पात्राच्या मध्यावर आले असता त्यांच्या पायाला कशाने तरी स्पर्श केल्याचे त्यांना जाणवले. तरीही ते तसेच पोहत राहिले. काही वेळानंतर मात्र त्यांचा पाय मगरीने जबडय़ात पकडला. थोरात यांनी जोराने हिसका देऊन मगरीच्या जबडय़ातून पाय सोडवला व ते पाण्याच्या बाहेर आहे. यानंतर त्यांना उपचारासाठी उपजिल्हा रूग्णालयात नेण्यात आले.
या घटनेची माहिती मिळताच वनक्षेत्रपाल तुषार नवले व वनपाल आनंद जगताप यांनी मधुकर थोरात यांची भेट घेऊन चौकशी केली. तसेच त्यांनी प्रितीसंगमावर घटनास्थळाची पहाणी केली.
शेतकरी व नागरिकांनी काळजी घ्यावी
दोन ते तीन महिन्यांपासून कृष्णा नदीपात्रातील मगरींचा वावर वाढला आहे. त्यामुळे कृष्णा नदीच्या काठावर राहणारे नागरिक व शेतकऱयांनी नदीपात्राकडे जाताना काळजी घ्यावी. तसेच मगर प्रवण क्षेत्रात नागरिकांनी पोहण्यासाठी येऊ नये. मगर दिसणाऱया क्षेत्रावर वन विभाग लक्ष ठेऊन आहे. नागरिकांनी वनविभागाला सहकार्य करावे.
तुषार नवले-वनक्षेत्रपाल
वन विभागाने मगरींचा बंदोबस्त करावा
कृष्णा नदीतील मगर ओढय़ामार्गे खोडशी गावात आली. तर खोडशी, प्रीतिसंगम व टेंभू प्रकल्प या परिसरातील नदीपात्रात नेहमीच शेतकरी, जनावरे व नागरिकांचा राबता असतो. अशावेळी मगरीमुळे जीवितास धोका होऊ नये, यासाठी वन विभागाने मगरींचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे.
कृष्णा नदीत एवढय़ा मगरी आल्या कोठून?
आजवर कृष्णा नदीतील ठराविक पाणवठय़ावर मगरींचे अस्तित्व दिसत होते. त्यातही सांगली जिल्हय़ातील कृष्णा नदीत जास्त प्रमाणात मगरी दिसत होत्या. मात्र दोन ते तीन महिन्यात कराड तालुक्यातील कृष्णा नदीत एवढय़ा मगरी कशा आल्या? असा सवाल उपस्थित होत आहे. कृष्णा काठावर राहणारे शेतकरी व मच्छिमार पूर्वापार कृष्णा नदीच्या पात्रात उतरत होते. मात्र असे मगरींचे दर्शन होत नव्हते, असे त्यांचे म्हणणे आहे.