महाराष्ट्रासह दहा राज्यांचा समावेश : संसदेतील विरोधी पक्षाच्या 17 खासदारांचेही मुर्मू यांना मतदान
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
देशाच्या पंधराव्या राष्ट्रपतीपदी द्रौपदी मुर्मू यांची निवड झाली आहे. गुरुवारी झालेल्या निकालात मुर्मू यांनी प्रतिस्पर्धी यशवंत सिन्हा यांचा मोठय़ा फरकाने पराभव केला. मतमोजणीमध्ये सुरुवातीपासूनचे आकडे मुर्मू यांच्या बाजूने असले तरी यशवंत सिन्हा यांना अपेक्षेपेक्षा कमी मते मिळाल्याने मते फिरल्याचे स्पष्ट झाले आहे. एकंदर 10 राज्यांतील 110 आमदारांनी क्रॉस व्होटिंग केल्याचे निकालातील अंतिम आकडेवारीवरून दिसून येते. तसेच यशवंत सिन्हा यांना तीन राज्यांमध्ये एकही मत मिळालेले नसून सहा राज्यांमध्ये 10 पेक्षा कमी मते मिळाली आहेत.
राष्ट्रपती निवडणुकीसाठी मतदान करणाऱयांची आकडेवारी पाहता सुरुवातीपासूनच रालोआच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांचा विजय निश्चित मानला जात होता. मात्र काँग्रेस आणि इतर विरोधी पक्षांच्या आमदार-खासदारांनी क्रॉस व्होटिंग करून त्यांच्या विजयाचे अंतर वाढवले. सर्वाधिक क्रॉस व्होटिंग आसाममध्ये झाले. या 126 सदस्यीय विधानसभेत एनडीएच्या आमदारांचे संख्याबळ 79 आहे, तर मुर्मू यांच्या समर्थनार्थ 104 मते पडली आहेत. याशिवाय मध्यप्रदेश आणि महाराष्ट्रातही मोठय़ा प्रमाणात क्रॉस व्होटिंग झाले. 10 राज्यांतील एकूण 110 आमदारांनी क्रॉस व्होट केले.
संसदेतील 17 खासदारांनीही आपल्या पक्षादेशाच्या विरोधात जाऊन मुर्मूंच्या बाजूने मतदान केल्याचे मतमोजणीअंती स्पष्ट झाले. शिवसेना, बीजेडी, वायएसआर काँग्रेस, बसपा, अकाली दल, निजद या घटक पक्षांसह काही अपक्ष खासदारांनी एनडीएच्या उमेदवाराला म्हणजेच मुर्मू यांना पाठिंबा दिला होता. संसदेच्या दोन्ही सभागृहांसह या सर्व पक्षांच्या आणि एनडीएच्या खासदारांची संख्या 529 आहे. यापैकी भाजप, शिवसेना आणि बसपाच्या प्रत्येकी दोन खासदारांनी मतदान केले नाही. त्यानुसार एनडीएच्या उमेदवाराला 523 खासदारांचा पाठिंबा मिळणार होता. मात्र, प्रत्यक्षात 540 मते मिळाल्याने विरोधी पक्षांच्या 17 खासदारांनी यशवंत सिन्हा यांच्याऐवजी एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांच्या बाजूने मतदान केले.
राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत एकूण 4,754 खासदार आणि आमदारांनी मतदान केले. त्यांच्या मताची किंमत 10 लाख 72 हजार 377 इतकी आहे. त्यापैकी 2,824 सदस्यांनी द्रौपदी मुर्मूंच्या बाजूने मतदान केले. अशाप्रकारे मुर्मू यांना एकूण 6 लाख 76 हजार 803 मते मिळाली. विजयासाठी 5.43 लाख मतांची आवश्यकता होती. साहजिकच द्रौपदी मुर्मू यांना विजयासाठी आवश्यक मतांपेक्षा 1.34 लाख इतकी जास्त मते मिळाली.
विरोधी पक्षाचे उमेदवार यशवंत सिन्हा हे मतमोजणीच्या पहिल्याच फेरीपासून खूपच मागे पडले. पहिल्या फेरीत मुर्मू यांना मिळालेल्या मतांचे मूल्य 3.78 लाख होते. तर, सिन्हा यांचे मतमूल्य 1.45 लाख होते. मुर्मू यांनी तिसऱया फेरीतच विजयासाठी अपेक्षित मतमूल्य पार केले. त्यानंतर चौथ्या फेरीत सिन्हा यांना अधिक मते मिळाली असली तरी त्यांना पराभवाचा सामना करावा लागला.
कर्नाटक, महाराष्ट्रात प्रत्येकी 4 मते रद्द
मध्यप्रदेश आणि पंजाबमधील प्रत्येकी पाच मते रद्द करण्यात आली. याशिवाय कर्नाटक, महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, दिल्लीतील प्रत्येकी चार, उत्तर प्रदेशातील तीन, बिहारमधील दोन, हिमाचल प्रदेश, झारखंड, मेघालय, तामिळनाडू, तेलंगणा, उत्तराखंड आणि पुदुच्चेरीमधील प्रत्येकी एक मत रद्द करण्यात आले.
यशवंत सिन्हा यांची ‘गृह’राज्यातही पिछाडी
यशवंत सिन्हा मूळचे बिहारमधील असूनही त्यांना या राज्यात जास्त मते मिळवता आली नाहीत. बिहारमधून सिन्हा यांना केवळ 106 मते मिळाली, तर मुर्मू यांच्या बाजूने 133 मते पडली. तथापि, द्रौपदी मुर्मू हय़ा मूळच्या ओडिशातील असल्यामुळे या राज्यात त्यांना भरघोस मतदान झाले. ओडिशात मुर्मूंना 137, तर सिन्हा यांना केवळ नऊ मते मिळाली.
विरोधी आमदारांचे क्रॉस व्होटिंग…
राज्य क्रॉस व्होटिंग पक्ष
- आसाम 22 काँग्रेस, एआययूडीएफ, बीपीएफ
- मध्यप्रदेश 19 काँग्रेस
- महाराष्ट्र 16 काँग्रेस, राष्ट्रवादी
- उत्तर प्रदेश 12 समाजवादी पक्ष
- गुजरात 10 काँग्रेस, राष्ट्रवादी
- झारखंड 10 काँग्रेस, राष्ट्रवादी
- बिहार 6 काँग्रेस, आरजेडी
- छत्तिसगड 6 काँग्रेस
- राजस्थान 5 काँग्रेस
- गोवा 4 काँग्रेस