‘जय जय रामकृष्ण हरि’ने सारे वातावरण भक्तीमय : देवदर्शन, गायनाच्या बैठकांनाही भाविकांची गर्दी,भाविकांसह आमदार, उद्योजकांनीही घेतले दर्शन,जयतिर्थ मेहुंडी, ऋषिकेश बडवेंच्या रंगल्या मैफिली
प्रतिनिधी /वास्को
गोव्यासह कर्नाटक तसेच महाराष्ट्रातील भाविकांसाठी आनंदपर्वणी असलेल्या मुरगावच्या श्री दामोदर भजनी सप्ताहाला काल बुधवारी दुपारी हजारो भाविकांच्या उपस्थितीत भक्तीमय, चैतन्यदायी वातावरणात प्रारंभ झाला. उद्योजक प्रशांत जोशी यांनी परंपरेप्रमाणे श्री दामोदर चरणी श्रीफळ ठेवून या अखंड चोवीस तासांच्या वार्षिक सप्ताहाला विधिवत प्रारंभ केला. त्यानंतर उपस्थित भजनी कलाकारांनी भजनाचे सूर आळवले. चोवीस तासात गोव्यातील अनेक भजनी पथके सप्ताहात भजन सादरीकरण करणार आहेत.
मागची दोन वर्षे कोरोना महामारीमुळे भजनी सप्ताहात केवळ पारंपरिक विधी करण्यात आले होते. प्रत्यक्ष भजन सादरीकरणालाही फाटा देण्यात आला होता. त्या ऐवजी ध्वनीमुद्रीत चोवीस तासांचे भजन सादर करण्यात आले होते.
भजनाने सारे वातावरण भक्तीमय
यंदा महामारीचे निर्बंध शिथिल करण्यात आल्याने मंदिरात प्रत्यक्ष भजनाचे आयोजन करण्यात आले. त्यामुळे कलाकारांनी उत्साहात भजन सादर केले. श्रीचरणी श्रीफळ अर्पण करताच अशोक मांद्रेकर यांनी ‘हरि जय जय रामकृष्ण हरि’ सूर आळवला आणि पारंपरिक भजनाची सुरुवात केली. यंदाही मोजक्याच भाविकांच्या आणि मान्यवरांच्या उपस्थितीत भजन सप्ताहाला प्रारंभ करण्याचे ठरले होते. मात्र, तरीही उत्साही भाविकांनी मंदिरात मोठी गर्दी केली होती.
भाविकांसह अनेक आमदारांनी घेतले दर्शन
भजन प्रारंभप्रसंगी प्रसिद्ध भजनी कलाकारांसह आमदार दाजी साळकर व आमदार संकल्प आमोणकर सपत्निक हजर होते. मुरगावचे नगराध्यक्ष लियो रॉड्रिक्स, उद्योजक नाना बांदेकर यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरही उपस्थित होते. वाहतुकमंत्री माविन गुदिन्हो, पर्यटनमंत्री रोहन खंवटे, डिचोलीचे आमदार डॉ. चंद्रकांत शेटय़े, म्हापशाचे आमदार ज्योसुआ डिसोजा, पेडणेचे आमदार प्रविण आर्लेकर, मांद्रेचे आमदार जीत आरोलकर, मयेचे आमदार प्रेमेंद शेट यांनीही श्रीचे दर्शन घेतले.
ऋषिकेश बडवे यांची रंगतदार मैफल
सकाळी 11 ते दुपारी 2 पर्यंत भाविकांसाठी देवदर्शन खंडित करण्यात आले होते. त्यामुळे देवदर्शनासाठी रांग नव्हती. दुपारी 2 नंतर भाविकांची दाट गर्दी होती. यंदा भाविकांमध्ये मोठा उत्साह दिसून आला. संध्याकाळी शहरातील पूर्वीच्या नटराज थिएटरजवळ बाजारकर समाजाची गायनाची पहिली बैठक झाली. ऋषिकेश बडवे यांनी श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. दुसरी बैठकी रात्री 12 वा. शहरातील जोशी चौकात झाली.
देवदर्शन, गायनाच्या बैठकांनाही गर्दी
संध्याकाळपासूनच वास्को परिसरात पावसाची रिपरिप सुरू झाली होती. रात्रीही हा पाऊस होता. मात्र, गायनाच्या बैठकांना श्रोत्यांचा चांगला प्रतिसाद लाभला. मुरगाव हिंदु समाजाने आयोजित केलेलया वार्षिक अन्नदान उपक्रमालाही हजारो भाविकांचा प्रतिसाद लाभला. यंदा गाडेकर समाज, फैलवाले समाज, दैवज्ञ ब्राह्मण समाज, नाभिक समाज व विश्वकर्मा समाजाला तयारीसाठी वेळ मिळाला नसल्याने त्यांनी पार, गायन, दिंडी, भजन आदी कार्यक्रमांना फाटा दिला.
या भजनी सप्ताहाची सांगता आज दुपारी श्रीफळ विसर्जन व गोपाळ काल्याने होणार आहे. त्यानंतर पुढील सहा दिवस वास्को शहरात विविध वस्तुंच्या दुकानांची फेरी गजबजणार आहे.