ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यातील केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या शिबिरात एका जवानाने सहकारी जवानांवर गोळीबार केला. या गोळीबारात चार जवानांचा मृत्यू असून, तीन जण गंभीर जखमी आहेत. आज पहाटे पावणेचारच्या सुमारास ही घटना घडली. बस्तर क्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक सुंदरराज पी यांनी यासंदर्भात माहिती दिली.
सुंदरराज पी म्हणाले, सुकमा जिह्यातील लिंगमपल्ली गावात केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या 50 व्या बटालियनचे शिबीर सुरू आहे. शिबीरादरम्यान, आज पहाटे पावणेचारच्या सुमारास रितेश रंजन नामक जवानाने आपल्या सहकारी जवानांवर अंदाधुंद गोळीबार केला. यात चार जवानांना आपला प्राण गमवावा लागला. तर तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर भद्राचलम परिसरातील रुग्णालयात उपचार सुरु आहेत.