ऑनलाईन टीम / छत्तीसगढ :
छत्तीसगढमधील रायपूर रेल्वे स्थानकावर उभ्या असणाऱ्या एका रेल्वेमध्ये अचानक स्फोट झाला. या स्फोटात सीआरपीएफचे 6 जवान गंभीर जखमी झाले आहेत. आज सकाळी 6 च्या सुमारास ही घटना घडली. या घटनेनंतर रेल्वे स्थानकावरील सुरक्षा वाढविण्यात आली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आज सकाळी सहाच्या सुमारास प्लॅटफॉर्म क्रमांक 2 वर असणाऱ्या रेल्वेमध्ये स्फोट झाला. या रेल्वेतून सीआरपीएफच्या 211 बटालियनचे जवान जात होते. सीआरपीएफचे जवान रेल्वेमध्ये असताना बाथरुमपाशी असणारा डेटोनेटर फुटला आणि हा स्फोट झाला. या स्फोटात 6 जवान जखमी झाले. त्यांना तात्काळ रुग्णालयात नेण्यात आले. या घटनेमध्ये इतर कोणत्याही प्रवाशांना इजा झाल्याची कोणतीही माहिती नाही. स्फोटानंतर रेल्वे स्थानकातील सुरक्षा वाढविण्यात आली. दरम्यान, 7.15 मिनिटांनी ही रेल्वे पुढील प्रवासासाठी रवाना झाली.