ऑनलाईन टीम / तरुण भारत :
गुजरातच्या पोरबंदर जिल्ह्यात निवडणूक ड्युटीसाठी आलेल्या सीआरपीएफच्या जवानाने आपल्या सहकाऱ्यांवर गोळीबार केला. या घटनेत दोन जवानांचा मृत्यू झाला असून, दोन जवान जखमी आहेत. जखमी जवानांवर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
गुजरातमध्ये विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी 1 डिसेंबरला मतदान होत आहे. या निवडणुकीच्या ड्युटीसाठी पोरबंदर जिल्ह्यात मणिपूरच्या सीआरपीएफ बटालियनचे जवान बोलावण्यात आले होते. शनिवारी संध्याकाळी काही कारणांमुळे या जवानांमध्ये किरकोळ वाद झाला. वादाचे रुपांतर भांडणात झाले. त्यानंतर एका जवानाने आपल्या एके-47 रायफलमधून सहकाऱ्यांवर काही राऊंड फायर केले. यात दोन जवानांचा जागीच मृत्यू झाला. तर दोन जवान जखमी आहेत. एका जवानाच्या पोटात तर दुसऱ्या जवानाच्या पायात गोळी लागली आहे. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
अधिक वाचा : सत्येंद्र जैन यांचा आणखी एक व्हिडिओ व्हायरल; कोठडीतच तुरुंग अधिकाऱ्यासोबत ‘VIP चर्चा’
दरम्यान, हे जवान आपापसात का भिडले हे अद्याप स्पष्ट झालं नाही. मात्र, गोळीबार झाला तेव्हा हे जवान ऑन ड्युटी नव्हते. या जवानांमध्ये भांडण कशामुळे झाले याचा पोलीस आता तपास करत आहेत.