पटना
येथील दिवाणी न्यायालयात शुक्रवारी कमी तीव्रतेचा स्फोट झाला आहे. या स्फोटात पोलीस इन्स्पेक्टरसह काही लोक जखमी झाले आहेत. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली. जखमी पोलिसांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या स्फोटाच्या तपासासाठी अनेक अधिकारी घटनास्थळी दाखल झाले होते. प्राथमिक तपासाअंती दिवाणी न्यायालयाच्या आवारात शुक्रवारी झालेला स्फोट क्रूड बॉम्बचा असल्याचे स्पष्ट करण्यात आले.
स्फोटामध्ये पोलीस उपनिरीक्षकाच्या हाताला दुखापत झाली आहे. परंतु त्यांची प्रकृती धोक्मयाबाहेर असल्याचे पीरबहोर पोलीस स्टेशनचे एसएचओ सबीउल हक यांनी सांगितले. अलीकडेच एका कारवाईत क्रूड बॉम्ब जप्त करण्यात आले होते. त्यापैकी काही क्रूड बॉम्ब सामान्य तपास प्रक्रियेचा भाग म्हणून न्यायालयात आणले असता हा स्फोट झाल्याचे सांगण्यात आले. तथापि, न्यायालयात आणण्यापूर्वी बॉम्ब योग्यप्रकारे निकामी करण्यात आले होते का, याचा तपास सुरू आहे.