तान्हुलीचा खून करून मातेचा आत्महत्येचा प्रयत्न, वास्कोतील धक्कादायक घटना
झुआरी नदीत बुडताना मातेला वाचविण्यात यश
प्रतिनिधी/ वास्को
अवघ्या चौदा महिन्यांच्या तान्हुलीचा श्वास कोंडून झोपेतच जीव घेण्याची घटना शनिवारी सकाळी वास्कोतील चिखली भागात घडली. या तान्हुलीचा जीव घेणारी दुसरी-तिसरी कुणीच नव्हे तर चक्क तिची आईच असल्याचे उघडकीस आल्याने शनिवारी वास्कोतील लोकांना धक्काच बसला. तान्हुलीच्या आईने या घटनेनंतर झुआरी पुलावरून उडी घेऊन जीव देण्याचा केलेला प्रयत्न मात्र व्यर्थ ठरला. तिला पुलाचे काम करणाऱया कामगारांनी वाचविले. या महिलेचे नाव निमिषा वाल्सन गोणे (36 मूळ केरळ, सध्या रा. चिखली वास्को) तर मृत चिमुकलीचे नाव समिरा असे आहे.
ही धक्कादायक घटना शनिवारी पहाटे पाचच्या सुमारास वास्को चिखली येथील पोलीस वसाहतीच्यामागील प्रतिष्ठित लोकवस्तीत घडली. वास्को पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार पहाटे साडेपाचच्या सुमारास पोलिसांना वास्को चिखलीतील एका महिलेने झुआरी पुलावरून उडी घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची माहिती आगशी पोलिसांकडून मिळाली. त्यानंतर वास्को पोलिसांनी चिखलीतील तिच्या घरी जाऊन चौकशी केली असता, चौदा वर्षांच्या तान्हुलीच्या खुनाचाही प्रकार उघडकीस आला. निमिषा हिने आपल्या पोटच्या गोळय़ाचा तोंड व नाक दाबून जीव घेतला होता.
दूध आणण्याच्या बहाण्याने शेजाऱयांकडून कार मागितली
निमिषा हिनेच आपल्या चौदा महिन्यांच्या तान्हुलीची हत्या केल्याचे जवळपास स्पष्ट झालेले असले तरी तिने असा कठोर निर्णय का घेतला याचा उलगडा होऊ शकलेला नाही. आपल्या मुलीची हत्या केल्यानंतर ती बंगल्याच्या बाल्कनीच्या पॅसेजमधून खाली उतरली व थेट शेजाऱयांकडे गेली. तिथे तिने आपली कार नसल्याचे सांगून मुलीसाठी दूध आणण्यासाठी कार देण्याची विनंती केली. ही थाप मारून ती थेट झुआरी पुलावर आली. कार तिने पुलाच्या शेजारी असलेल्या मारूती मंदिरासमोर पार्क केली व चालतच पुलावर काही अंतर पुढे गेली व जीवन संपवण्याच्या उद्देशाने समुद्रात उडी घेतली. मात्र, समुद्रात कुणी तरी उडी घेतल्याचा आवाज झुआरीवरील नवीन पुलाच्या कामात व्यस्त असलेल्या कामगारांना आल्याने त्यांनी लगेच आपले जहाज त्या वळवून तिला बुडताना वाचविले व आगशी पोलिसांशी संपर्क साधून तिला पोलिसांच्या हवाली केले. त्यानंतर पोलिसांनी तिला गोमेकॉमध्ये दाखल केले.
जर्मनीहून महिन्याभरापूर्वीच गोव्यात आली होती
अधिक माहितीनुसार निमिषा ही पती नीलेशसमवेत जर्मनीला होती. साधारण महिन्याभरापूर्वीच ती पती व तान्हुलीसमवेत भारतात आली. बंगळूरला आपल्या बहिणीकडे काही दिवस थांबली व आठ दिवसांपूर्वीच ती वास्को चिखली येथे आपल्या माहेरी आली होती. तर तिचे पती पुन्हा जर्मनीला रवाना झाले होते. शनिवारी घडलेल्या घटनेची माहिती तिच्या पतीला देण्यात आलेली असून तीचे पती आज संध्याकाळपर्यंत गोव्यात दाखल होण्याची शक्यता आहे. पती दाखल झाल्यानंतरच या घटनेवर अधिक प्रकाश पडणार आहे.
सुशिक्षित, सुखवस्तू कुटुंबातील या घटनेमुळे वास्कोवासायांना धक्का
स्थानिकांकडून मिळालेल्या माहितीनुसार जीव देण्याच्या प्रयत्नात सुदैवानेच वाचलेली निमिषा ही उच्चशिक्षित आहे. तिला अन्य दोन बहिणी असून एक बंगळूरला तर दुसरी गोव्यातच असते. आई हयात नसल्याने वडील घरी एकटेच असतात. गोव्यातील बहिणी येऊन जाऊन वडिलांची काळजी घेत असतात. जर्मनीत राहणाऱया निमिषानेही आठ दिवस वडिलांना सोबत दिली. चिखलीतील पोलीस वसाहतीमागे वाल्सन कुटुंबाचा बंगला आहे. या बंगल्याच्या पहिल्या मजल्यावर झोपलेल्या आपल्या मुलीने कोणते कृत्य केले याचा पत्ता वडिलानाही नव्हता. पोलीस घरी येताच त्यांना या घटनेची कल्पना आली व त्यांनाही धक्काच बसला. निमिषा ही मूळ केरळ कुटुंबातील आहे. तर मूळ महाराष्ट्रातील आणि गोव्यात सांकवाळच्या एमईएस कॉलेज परिसरात राहणाऱया नीलेश गोणे याच्याशी तिचा प्रेमविवाह झाला होता. लग्नानंतर बऱयाच वर्षांनी त्यांना कन्यारत्न प्राप्त झाले होते. परंतु तिचा मातेच्या हातूनच अवघ्या चौदा महिन्यांत अंत झाला. सुखवस्तू कुटुंबात घडलेल्या या घटनेमुळे वास्को परिसरातील लोकांना शनिवारी धक्काच बसला.
निमिषाचे कृत्य मानसिक तणावाखाली की अन्य काही ?
निमिषाने आपल्या पोटच्या मुलीचा निर्दयपणे खून का केला, असा प्रश्न सध्या चर्चिला जात आहे. जर्मनीत असलेल्या पतीचे व तिचे हल्ली काही बिनसले होते का, मुलीचा खून करून स्वतःचेही जीवन संपवण्यामागे काही कौटुंबीक तणाव होता का, खुप दिवसांच्या मानसिक तणावातून मुक्त होण्यासाठीच तिने क्रूर पावले उचलले की अचानक उफाळून आलेल्या नकारार्थी विचारांतून तिने हे पाऊल उचलले या प्रश्नांची उत्तरे सध्या शोधली जात आहेत. निमिषा सध्या गोमेकॉमध्ये उपचार घेत आहे. तिने हाताची नसही कापण्याचा प्रयत्न केला होता. तिच्या हाताला जखम झालेली आहे. तान्हुलीचा खून आणि स्वतःच्या आत्महत्येचा प्रयत्न या दोन्ही घटनांची उत्तरे निमिषा आणि तिचा पतीच देऊ शकेल. काही लोकांकडून मिळालेल्या माहितीनुसार निमिषा ही मानसिक तणाखाली वावरत होती. ती वास्कोतीलच एका मानसोपचार तज्ञाला काही दिवसांपूर्वीच भेटली होती.
खून व आत्महत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा नोंद
वास्को पोलीस या सर्व बाबींचा सखोल तपास करीत आहेत. सध्या तिच्यावर पोलिसांनी मुलीच्या खूनाचा आणि आत्महत्येच्या प्रयत्नाचाही गुन्हा नोंद केलेला आहे. वास्को पोलीस स्थानकाचे निरीक्षक कपिल नाईक व इतर पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून तान्हुलीचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी हॉस्पिटलमध्ये पाठवून दिला.